कीव्हवर रशियाचा कब्जा झाल्यास प्लॅन बी तयार : अमेरिकेकडून खबरदारीच्या उपाययोजना
युक्रेनच्या सरकारने स्वतःचे अध्यक्ष वोल्दोमिर जेलेंस्की यांना रशियाच्या शार्प शूटर्सपासून वाचविण्यासाठी प्लॅन बी तयार केला आहे. हल्ल्याला 11 दिवस उलटल्यावरही रशियाचे सैन्य जेलेंस्की यांच्यानजीकही पोहोचू शकलेले नाही. जेलेंस्की दररोज स्वतःचे ठिकाण बदलत आहेत. राजधानी कीव्हमध्येच त्यांच्यासाठी युक्रेनच्या सैन्याने अनेक सेफ हाउस निर्माण केले आहेत.
युक्रेनला समर्थन देत असलेल्या अमेरिकेच्या नेतृत्वाखालील देशांनी जेलेंस्की यांच्या सुरक्षेवरून एक संयुक्त योजना तयार केली आहे. कीव्हवर रशियाच्या कब्जाची भीती पाहता ही योजना आखण्यात आली आहे. युक्रेनमध्ये रशियापुरस्कृत सरकार स्थापन करण्यात आल्यास जेलेंस्की यांचे निर्वासित सरकार युक्रेनला पश्चिमेकडील कार्पेथियाच्या पर्वतांमध्ये निर्माण करण्यात आलेल्या अध्यक्षीय प्रासादातून चालविले जाणार आहे.
शस्त्रास्त्रपुरवठा सुरूच राहणार
युक्रेनला पाश्चिमात्य देशांकडून शस्त्रास्त्रांचा पुरवठा सुरूच ठेवला जाणार आहे. तसेच रशियावरील आर्थिक निर्बंध देखील हटविण्यात येणार नाहीत. अमेरिकेकडून युक्रेनच्या सैनिकांना आर्थिक आणि सैन्यमदत करत राहणार असल्याचे एका अधिकाऱयाने सांगितले आहे.
जेलेंस्की यांच्या सुरक्षेची योजना
जानेवारीमध्ये अमेरिकेच्या दौऱयावर गेलेले जेलेंस्की यांनी स्वतःच्या तसेच कुटुंबाच्या सुरक्षेविषयी विचारणा केली होती. यावर अमेरिकेने त्यांना युक्रेनमधील लोकांची हिंमत अन धैर्य कायम ठेवण्याची गरज असल्याचे सांगितले होते. त्यानंतरच जेलेंस्की यांनी देश सोडणार नसल्याचे विधान केले होते. जेलेंस्की यांच्या पत्नी ओलेना देखील युक्रेनच्या जनतेला संबोधून व्हिडिओ संदेश प्रसारित करत आहेत. परंतु ओलेना युक्रेनमध्ये आहेत की नाही याबद्दल कुठलीच स्पष्ट माहिती समोर आलेली नाही.
सरकारमधील नंबर-2
युक्रेनच्या राज्यघटनेनुसार अध्यक्ष जेलेंस्की यांच्यानंतर दुसऱया क्रमांकावर संसदेचे सभापतींचे स्थान आहे. सध्या रुसलान स्टीफानचुक हे सभापती आहेत. हल्ल्याच्या भीतीने युक्रेनच्या गुप्तचर यंत्रणांनी रुसलान आणि जेलेंस्की यांना वेगवेगळय़ा सेफ हाउसमध्ये ठेवले आहे. अलिकडेच युक्रेनने युरोपीय महासंघाच्या सदस्यत्वाची मागणी केली होती, त्यावेळी रुसलान हे जेलेंस्की यांच्यासोबत दिसून आले होते.
प्रतिकाराचा पर्यायी चेहरा
युद्धावेळी प्रतिकाराचा पर्यायी चेहरा असणे आवश्यक असते. सध्या पूर्ण जग जेलेंस्की यांनाच युक्रेनचा मुख्य चेहरा म्हणून ओळखते. जेलेंस्की कदाचित कीव्हबाहेर एखाद्या तळावर असू शकतो असे उद्गार युक्रेनच्या शोधपत्रकार कर्यस्तना होलिसंका यांनी काढले आहेत.
जेलेंस्की यांच्या हत्येचे 3 वेळा प्रयत्न
मागील आठडय़ात जेलेंस्की यांची हत्या करण्याचे रशियाने तीनवेळा प्रयत्न केले आहेत. यात रशियन गुप्तचर यंत्रणा एफएसबीसह वॅगर्नर ग्रूप आणि चेचन किलर्स सामील होते. युक्रेनच्या गुप्तचर पोलिसांनुसार रशियाच्या डबल एजंट्सनी यासंबंधी माहिती दिली होती.