आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांची माहिती कोविड परिस्थिती हाताळण्यासाठी सज्जता
प्रतिनिधी / पणजी
राज्यात कोरोना रूग्णांचा आलेख वाढत आहे. कोरोना रूग्णांची वाढ पाहता गोवा मेडिकल कॉलेज आणि मडगाव येथील दक्षिण गोवा हॉस्पिटलमध्ये बेड्सची संख्या कमी आहेत. गोवा मेडिकल कॉलेज व हॉस्पिटलमधील बेड्सही भरले असून 10 जणांना ट्रॉलीवर ठेवून उपचार करावे लागत आहेत. त्यामुळे दक्षिण गोव्यातील कोविड हॉस्पिटलमध्ये आणखी 300 बेड्सची व्यवस्था करण्यात येणार आहे. आवश्यकता पडली तर बांबोळी येथील श्यामाप्रसाद मुखर्जी स्टेडियमसुद्धा सुरू करू, अशी घोषणा आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांनी काल सोमवारी पणजीत आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत केली.
कोविड हॉस्पिटलमध्ये बेड्सची क्षमता भरत असल्याने सरकारने येत्या काही दिवसात निर्बंध लावणे गरजेचे आहे. मडगाव येथील दक्षिण गोवा हॉस्पिटलची क्षमता 200 बेडची आहे परंतु हे बेड्सही भरत आले आहेत. या हॉस्पिटलमध्ये आणखी 300 बेड्सची व्यवस्था करण्यात येणार आहे.
काही प्रमाणात निर्बंध लावणे आवश्यक
गोवा मेडिकल कॉलेजची क्षमता 150 बेड्सची असून त्यातील मोजकेच बेड्स शिल्लक राहिले आहेत. त्यामुळे कोरोना वाढू न देण्याकडे लक्ष देणे आवश्यक आहे. राज्यात निर्बंध लावण्याबाबत मुख्यमंत्र्यांकडे चर्चा करण्यात येणार आहे. सध्याच्या परिस्थितीत काही प्रमाणात निर्बंध लावणे आवश्यक आहेत. ज्यामुळे कोरोनावर नियंत्रण येऊ शकते, असे राणे यांनी यावेळी सांगितले.
वैद्यकीय यंत्रणा, मनुष्यबळात करणार वाढ
राज्यात चाचणी सुविधाही वाढविण्यात येणार आहेत. आरोग्य खात्यातर्फे तीन चाचणीच्या यंत्रणा गोमेकॉ व दोन्ही जिल्हा इस्पितळात सुरु करण्यात येणार आहेत. दिवसाला 2500 ते 3000 चाचण्या करण्याचे लक्ष्य आहे ज्यामुळे वाढत्या कोरोनावर नियंत्रण मिळू शकते. याशिवाय वैद्यकीय अधिकाऱयांची संख्या कोविड इस्पितळात वाढविण्यात येणार आहे.
स्ट्रेन कळण्यासाठी नमूने पाठविले पुण्यात
कोरोनाचा स्ट्रेन कळावा यासाठी सरकारतर्फे जिनोमिक टेस्टिंग लॅबोरेटरी सुरू करण्यात येणार आहे. पुणे येथील नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ वायरोलॉजी येथे स्ट्रेन कळावा यासाठी काही नमूने पाठविले आहेत, परंतु अजूनपर्यंत त्या नमून्यांचा निकाल आलेला नाही.
मास्क, समाजिक अंतर पाळणे अत्त्यावश्यक
सध्या दररोज 30 ते 40 नवीन कोविडच्या रूग्णांचा प्रवेश सरकारी इस्पितळांमध्ये होत आहे. भविष्यात हा आकडा वाढण्याचीसुद्धा शक्यता आहे. त्यामुळे मागील अनुभव घेऊन आपण साधनसुविधांसह या महामारीला सामोरे जाण्यासाठी सज्ज होणे गरजेचे आहे. हे चार महिने कोरोनाविषयी सतर्क राहून थोडे निर्बंध लावणे आवश्यक आहे. मास्क लावणे, सामाजिक अंतर पाळणेही आवश्यक आहे, असे राणे यावेळी म्हणाले.
कडक निर्बंधांची मागणी मुख्यमंत्र्यांनी फेटाळली
राज्यातील वाढत्या कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी काही कडक निर्बंध लागू करण्याची आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांची मागणी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी पुन्हा एकदा फेटाळून लावली असून सध्या तरी सरकारचा तसा कोणताही विचार नसल्याचे स्पष्ट केले आहे. निर्बंध लावण्याचा कोणताही निर्णय सरकारने घेतलेला नाही. कोरोना परिस्थितीवर सरकार लक्ष ठेवून आहे. लोकांनी स्वतःची काळजी घ्यावी. कोरोनाचे नियम – अटी सर्वांनी पाळावेत. गोव्यात येणाऱया पर्यटकांनी देखील त्याचे पालन करावे. कोरोना चाचणी व लसीकरण मोठय़ा प्रमाणात वाढवण्याची गरज त्यांनी प्रकट केली.