प्रतिनिधी /काणकोण
पावसाळी हंगामात 1 जून ते 30 जुलैपर्यंत मासेमारीवर बंदी राहणार असल्यामुळे काणकोण तालुक्यातील तळपण आणि साळेरी जेटीवर सर्वत्र सामसूम पसरली आहे. एरव्ही मासेविक्रेत्या महिला आणि प्रमुख व्यावसायिक यांच्या गर्दीने गजबजणाऱया या दोन्ही ठिकाणी सामसूम असून मच्छीमारांपैकी काहींनी आपल्या बोटी नांगरून ठेवल्या आहेत, तर काहींनी सरळ किनाऱयावर आणून बांधून ठेवल्या आहेत.
तळपण आणि साळेरी या ठिकाणी 100 पेक्षा अधिक लहान-मोठय़ा मासेमारी बोटी असून या भागांतील हाच प्रमुख असा व्यवसाय आहे. बोटी बांधून ठेवल्यानंतर जाळी विणणे, काही ठिकाणी जाळी वाळत ठेवण्याच्या कामात मच्छीमार गुंतले असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. दरम्यान, मुख्य रस्त्यावरून तळपण जेटीजवळ जाणाऱया रस्त्याची पूर्ण वाताहत झालेली आहे. या जेटीजवळच सागरी पोलिसांचे कार्यालय आहे. दुसऱया बाजूला श्री गणपती मंदिर आहे. शिवाय तळपण जेटीजवळ मत्स्योद्योग खात्याने मच्छीमारांसाठी जाळी विणण्यासाठी खास सभागृह उभारले आहे. अवघ्घ्या 100 मीटर इतक्या लांबीच्या या ठिकाणच्या रस्त्यावर पडलेल्या खड्डय़ांमुळे जेटीवर जाणे जिकिरीचे बनले असल्याच्या स्थानिक नागरिकांच्या तक्रारी आहेत.