अण्णाद्रमुक नेते मणिकनंदन बेंगळूर येथून ताब्यात- मलेशियन महिलेवर बलात्काराचा आरोप
वृत्तसंस्था/चेन्नई
तामिळनाडूचे माजी मंत्री आणि अण्णाद्रमुकचे नेते एम. मणिकनंदन यांना अटक करण्यात आली आहे. त्यांना बेंगळूर येथे चेन्नई शहर पोलिसांनी जेरबंद केले आहे. मणिकनंदन यांच्यावर मलेशियन महिलेवर बलात्कार केल्याच आरोप आहे. तामिळनाडू सरकारमध्ये त्यांनी माहिती-तंत्रज्ञान मंत्री म्हणून काम पाहिले आहे.
मलेशियन महिलेवर बलात्कार करणे, गर्भपात करविणे आणि जीवे मारण्याची धमकी देण्याचा आरोप त्यांच्यावर आहे. याप्रकरणी अद्यार महिला पोलीस स्थानकात तक्रार नोंदविण्यात आली आहे. मणिकनंदन यांनी विवाहाचे आमिष दाखवत बलात्कार केला, तसेच गरोदर राहिले असता माझ्या मर्जीच्या विरोधत गर्भपात करविण्यास भाग पाडल्याचा आरोप महिलेने केला आहे.
मणिकनंदन यांनी आरोप फेटाळले
महिलेला ओळखतही नसल्याचा दावा मणिकनंदन यांनी यापूर्वी केला होता. त्यानंतर त्यांनी याप्रकरणी अंतरिम जामिनासाठी मद्रास उच्च न्यायालयात धाव घेतली होती. आपल्यावरील सर्व आरोप खोटे आणि काल्पनिक असल्याचे त्यांचे म्हणणे आहे.
याचिका फेटाळली
भादंविचे कलम 313 अंतर्गत गुन्हा नेंदविण्याला आला असून ही बाब चुकीची असल्याचा दावा त्यांचा दावा होता. पण न्यायालयाने त्यांची अंतरिम जामिनाची याचिका फेटाळली होती. त्यानंतर मणिकनंदन यांना अटक करण्यासाठी पोलिसांचे पथक मदुराई येथे पोहोचले होते.