ऑनलाईन टीम/ तरुण भारत
कोरोनाचा वाढता धोका पाहता तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन हे स्वतः रस्त्यावर उतरल्याचं पाहायला मिळालं आहे. स्टॅलिन यांनी जनजागृती करत लोकांना मास्क वाटले. तसेच लोकांना खबरदारी घेण्याच्या आणि मास्क घालण्याच्या सूचना देखील दिल्या. मुख्यमंत्री मंगळवारी मास्कचे वाटप करण्यासाठी त्यांच्या गाडीमधून खाली उतरले आणि त्यांनी आजूबाजूच्या लोकांना मास्कचे वाटप केले. मुख्यमंत्र्यांनी विशेषत: त्यांचा ताफा अशा ठिकाणी थांबवला जिथे लोक त्यांना मास्कशिवाय दिसत होते. मुख्यमंत्री जात असताना त्यांना रस्त्यात मास्क न घातलेले लोक दिसले. यानंतर मुख्यमंत्र्यांनी त्यांना मास्क घालण्याच्या सूचना दिल्या. सोशल मीडियावर याचा एक व्हिडीओ जोरदार व्हायरल होत आहे.