ऑनलाईन टीम / चेन्नई :
तामिळनाडूच्या विरुधूनगर जिल्ह्यातील सत्तूर भागात फटाक्यांच्या फॅक्टरीत आज दुपारी झालेल्या स्फोटात 11 कामगारांचा मृत्यू झाला आहे. तर 36 जण जखमी झाले आहेत.
फटाक्याच्या फॅक्टरीत फटाके बनविण्यासाठी वेगवेगळे केमिकल्स एकत्र केले जात होते, तेव्हा हा स्फोट झाला. घटनास्थळी 6 अग्निशमन दलाचे बंब दाखल झाले होते. अग्निशमन दलाच्या जवानांनी अथक प्रयत्न करून आगीवर नियंत्रण मिळवले. मात्र, तोपर्यंत या आगीत 11 कामगारांचा होरपळून मृत्यू झाला. तर 36 कामगार जखमी झाले आहेत.
या दुर्दैवी घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पंतप्रधान मदत निधीतून 2 लाख रुपयांची नुकसान भरपाई जाहीर करण्यात आली आहे, तर गंभीर जखमींना 50 हजार रुपयांची मदत देण्यात येणार आहे. तर तामिळनाडूच्या मुख्यमंत्र्यांनी मृतांच्या नातेवाईकांना 3 लाख रुपयांची नुकसान भरपाई आणि जखमींना 1 लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे.