हेरात प्रांताचे संपूर्ण सरकार शरण – अफगाणिस्तानमध्ये तीव्र संघर्ष
काबूल / वृत्तसंस्था
उत्तर अफगाणिस्तान भागात तालिबानची जोरदार आगेकूच सुरू असून त्यांनी कंधारवरही कब्जा केला आहे. आता पुढील टप्प्यात ते मजार-ए-शरीफवर नियंत्रण मिळवण्याच्या पवित्र्यात आहेत. अनेक महत्त्वाच्या शहरांमध्ये तालिबान आणि अफगाणिस्तान लष्कर यांच्यात भयंकर असा संघर्ष सुरू आहे. दरम्यान, दरम्यान, हेरात प्रांताचे संपूर्ण सरकार तालिबानला शरण गेले आहे. तर राज्याचे राज्यपाल, पोलीस प्रमुख, एनडीएस कार्यालयाचे प्रमुख यांना तालिबान्यांनी ताब्यात घेतले आहे. याशिवाय तालिबानविरोधातील युद्धात प्रमुख असणाऱया मोहम्मद इस्माईल खानलाही पकडले आहे.
अमेरिकेने अफगाणिस्तानमधून सैन्य मागे घेतल्यानंतर तालिबान्यांची दहशत वाढली आहे. सध्या अफगाणिस्तानच्या दोन तृतीयांश भागावर तालिबान्यांनी कब्जा केला आहे. तालिबानच्या आक्रमकपणा कायम राहिल्यास काही महिन्यातच तालिबानी दहशतवादी पूर्ण देशच काबीज करण्याची शक्मयता आहे. अमेरिकेच्या गुप्तचर अहवालानुसार 90 दिवसांत तालिबान अफगाणिस्तानवर पूर्ण नियंत्रण मिळवू शकतो.
गेल्या तीन दिवसात तालिबानने अफगाणिस्तानमधल्या चार अन्य प्रांतांच्या राजधानीवर कब्जा केला. तालिबान्यांनी आणखी एक महत्त्वाचे शहर कंधारवर कब्जा मिळवला आहे. तालिबान्यांनी कब्जा मिळवलेले हे अफगाणिस्तानातील 34 वे महत्त्वाचे शहर आहे. तालिबान्यांनी गुरुवारी रात्री कंधारमध्ये प्रवेश करताच अधिकाऱयांना जीव मुठीत घेत पलायन करावे लागले. तालिबानी दहशतवाद्यांनी शहरावर हल्ला चढवत इ.स.पूर्व 500 मधील एका मशिदीसह सरकारी इमारतींवरही ताबा मिळवला. सरकारी इमारतींमध्ये गोळीबार करत दहशतवाद्यांनी अधिकाऱयांना बाहेर काढत दहशत माजवली. आता पूर्ण शहर तालिबान्यांच्या ताब्यात गेले आहे. तालिबानी दहशतवाद्यांनी गजनीवर कब्जा मिळवल्यानंतर राजधानी काबूलचा देशाच्या दक्षिण भागाशी संपर्क तुटला आहे. काबूलला दक्षिण प्रांताशी जोडणाऱया प्रमुख महामार्गावर तालिबानने ताबा मिळवला आहे. याच राजमार्गाचा वापर करत अमेरिकी आणि नाटोच्या सैन्याने तालिबानी दहशतवाद्यांना मागे ढकलले होते. आता हा प्रमुख मार्गच तालिबानच्या ताब्यात गेला आहे. ते सरकारी अधिकाऱयांवर दबाव टाकत असून नागरिकांमध्ये दहशत पसरवत आहेत.
अधिकाऱयांच्या बचावासाठी अमेरिकन सैन्य दाखल
अफगाणिस्तानातील परिस्थिती बिकट झाल्याने काबूलच्या दुतावासातील आपल्या अधिकाऱयांना सुरक्षित बाहेर काढण्यासाठी अमेरिकेने 3 हजार सैनिकांना पाठवले आहे. दोन दिवसात लष्कराची एक आणि नौदलाच्या दोन तुकडय़ा काबूलला पोहचतील, असे पेंटागॉनकडून सांगण्यात आले. हे सैनिक दुतावासातील अधिकाऱयांना बाहेर काढण्यासाठी मदत करणार आहेत. तसेच अफगाणिस्तान सोडणाऱया ब्रिटीश नागरिकांच्या मदतीसाठी 600 सैनिक तैनात करण्यात आल्याचे ब्रिटनकडून सांगण्यात आले.
गनी सरकारसमोर मोठा पेचप्रसंग
महत्त्वाची शहरे हातातून निसटल्यामुळे अशरफ गनी यांच्यावरचा दबाव वाढत चालला आहे. गनी सातत्याने मंत्री आणि कमांडर बदलत असले तरी अफगाणमध्ये फार मोठी उलथापालथ होत असल्याचे दिसून येत आहे. अफगाणिस्तानमधील सर्व राजकीय नेते एकत्र आले नाहीत तर गनी यांचे सरकार काही दिवसात निष्प्रभ होईल अशी चिन्हे आहेत. टोलो न्यूजने दिलेल्या बातमीनुसार, अफगाणिस्तानचे अर्थमंत्री खालिद पयिंदा यांनी देश सोडला आहे. अफगाणिस्तानमधील परिस्थिती सातत्याने बिघडत असून तालिबान्यांनी महत्त्वाचे प्रदेश ताब्यात घेतल्याने सर्वत्र भीतीचे वातावरण आहे.