बरादरला ओलीस ठेवल्याचे वृत्त
वृत्तसंस्था / काबूल
अफगाणिस्तानचे उपपंतप्रधान मुल्ला बरादर याला कंधारमध्ये ओलीस ठेवण्यात आल्याचे वृत्त असले तरीही याला अद्याप पुष्टी मिळू शकलेली नाही. तर तालिबानचा नेता हैबतुल्लाह अखुंदजादाचा मृत्यू झाल्याचा दावा काही प्रसारमाध्यमांनी केला आहे. तालिबानच्या या दोन्ही नेत्यांबद्दल गोपनीयता बाळगली जात आहे.
ब्रिटनच्या एका नियतकालिकाच्या वृत्तअहवालानंतर तालिबानच्या क्रमांक एक आणि क्रमांक 2 च्या या नेत्यांबद्दल अनेक कयास वर्तविण्यात येत आहेत. पण तालिबानने हे वृत्त फेटाळले आहे. तालिबानचे सर्व मोठे नेते जिवंत असल्याचे स्पष्टीकरण दहशतवादी संघटनेकडून देण्यात आले.
सत्तेच्या या संघर्षात तालिबानचा सर्वेसर्वा हिबतुल्लाह अखुंदजादाचा मृत्यू झाला असून उपपंतप्रधान मुल्ला बरादरला ओलीस ठेवयणत आल्याचा दावा द स्पेक्टेटर या ब्रिटनमधील नियतकालिकाने केला आहे. सत्तेसाठीचा हा संघर्ष तालिबानच्या दोन गटांमध्येच झाला होता. हक्कानी गटासोबत झालेल्या या संघर्षात सर्वाधिक नुकसान मुल्ला बरादरलाच झाल्याचे नियतकालिकाने म्हटले आहे.
सप्टेंबरमध्ये तालिबानच्या दोन्ही गटांची बैठक झाली होती. या बैठकीत हक्कानी नेता खलील-उर-रहमानीने बरादरला ठोसे लगावण्यास सुरुवात केली होती. बरादर सातत्याने तालिबानच्या सरकारमध्ये बिगरतालिबानी आणि अल्पसंख्याकांना स्थान देण्यासाठी प्रयत्नशील होता.
मुल्ला बरादरने अलिकडेच एक चित्रफितरुपी संदेश प्रसारित केला होता. पण पर्यवेक्षकांनुसार ही चित्रफित ओलीस ठेवण्यात आल्यानंतरची असावी. अखुंदजादा नेमका कुठे आहे हे अद्याप समजू शकलेले नाही. अखुंदजादा दीर्घ काळापासून कुणालाच दिसलेला नाही तसेच त्याच्याकडून कुठलाच संदेश प्रसारित करण्यात आलेला नाही. अशा स्थितीत अखुंदजादाचा मृत्यू झाल्याचा कयास वर्तविला जात आहे. तालिबानमध्ये यापूर्वी सत्तेवरून अशा संघर्ष दिसून आला नव्हता. तालिबान आणि हक्कानी नेटवर्क 2016 मध्ये एकत्र आले होते.