आरोग्यमंत्री डॉ. सुधाकर यांची सूचना
प्रतिनिधी / बेंगळूर
राज्यातील सर्व सरकारी तालुका इस्पितळांमध्ये तीन दिवसांत किमान 6 व्हेंटिलेटर बसविण्याची सूचना आरोग्यमंत्री डॉ. के. सुधाकर यांनी दिली आहे. त्याचप्रमाणे डॉक्टरांची कमतरता दूर करण्यासाठी दोन-तीन दिवसांत 2,400 डॉक्टरांची थेट नेमणूक करण्यात येईल, अशी माहितीही त्यांनी दिली.
येथे पत्रकारांशी ते बोलत होते. तालुका इस्पितळांमध्ये तीन महिन्यापूर्वीच 60 ऑक्सिजन बेड व सहा व्हेंटिलेटर बसविण्याची सूचना दिली होती. मात्र, काही इस्पितळांमध्ये हे काम अजुनही प्रगतीपथावर आहे. तीन दिवसांमध्ये प्रत्येक तालुका इस्पितळांमध्ये 6 व्हेंटिलेटर आणि 50 ऑक्सिजन बेड तयार ठेवण्याची सूचना देण्यात आली आहे. तालुका इस्पितळांमध्ये पायाभूत सुविधा वाढविण्यावर भर देण्यात आला आहे. विविध तालुका इस्पितळांना भेटी देऊन आपण तेथील व्यवस्थेची स्वतः पाहणी करणार आहे, असेही ते म्हणाले.
2,400 डॉक्टरांच्या नेमणुका करणार
तालुका इस्पितळांमधील डॉक्टरांची कमतरता दूर करण्यासाठी आणि कोरोनाच्या दुसऱया लाटेचा सामना करण्यासाठी चार महिन्यांपूर्वी 780 तज्ञ डॉक्टर आणि 1,400 हून अधिक डॉक्टरांच्या नेमणुकीची प्रक्रिया हाती घेतली होती. आता एकूण 2,400 डॉक्टरांच्या नेमणुकीचा दोन-तीन दिवसांत आदेश देण्यात येईल, अशी माहितीही डॉ. सुधाकर यांनी दिली.