छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळय़ाची विटंबना खपवून घेणार नाही : तालुक्यातून तीव्र निषेध
वार्ताहर /किणये
बेंगळूर येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळय़ाची विटंबना करण्यात आली. त्याचे तीव्र पडसाद सर्वत्र उमटत आहेत. बेळगाव तालुक्यातूनही या कृत्याचा निषेध करण्यात आला असून गावागावांमध्ये शिवाजी महाराजांच्या मूर्तींना दुग्धाभिषेक करण्यात येत आहे.
छत्रपती शिवाजी महाराज हे समस्त हिंदूंचे आराध्य दैवत आहेत. हिंदवी स्वराज्याची स्थापना करीत असताना शिवरायांनी सर्व जाती-धर्माच्या लोकांना एकत्र करून स्वराज्याची स्थापना केली. याचा विसर या समाजकंटकांना पडलेला आहे. शिवाजी महाराजांच्या पुतळय़ावर शाईफेक करून काही समाजकंटकांनी हे कृत्य केले आहे. अशा समाजकंटकांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणीही तालुक्यातील नागरिक, शिवप्रेमींतून होत आहे.
सीमाभागातील मराठी जनतेवर कर्नाटक सरकार सातत्याने अन्याय, अत्याचार करीत आहे. आता तर कहरच सुरू झाला आहे. शिवरायांच्या मूर्तीची विटंबना करण्याचे धाडस समाजकंटक कसे करू शकतात? त्या समाजकंटकांना कर्नाटक सरकारने चांगलीच अद्दल घडविण्याची मागणी होत आहे. वाघवडे गावात या कृत्याचा जाहीर निषेध करण्यात आला असून गावात समाजकंटकांबद्दल तीव्र निषेध रॅली काढण्यात आली. समस्त हिंदूंचे आराध्य दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या गावातील मूर्तीला दुग्धाभिषेक करण्यात आला. यावेळी छत्रपती शिवाजी महाराज की जय, जय भवानी, जय शिवाजी, अशा घोषणांनी गाव दुमदुमून गेला होता. यावेळी शिवप्रेमी व ग्रामस्थ मोठय़ा संख्येने उपस्थित होते.
सावगाव येथील शिवस्मारक सेवा समिती व शिवप्रेमींच्यावतीने गावात बेंगळूरमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळय़ाची विटंबना केल्याच्या कृत्याचा जाहीर निषेध करण्यात आला. सदर समाजकंटकांची तिगडी तयार करून चौकामध्ये त्याचे दहन करून जाहीर निषेध करण्यात आला. शिवस्मारक येथे असलेल्या छत्रपती शिवाज महाराजांच्या मूर्तीची पूजा करून दुग्धाभिषेक करण्यात आला. तालुक्याच्या काही भागात शनिवारी व रविवारी शिवप्रेमी व व्यावसायिकांनी स्वयंस्फूर्तीने आपली दुकाने बंद ठेवली व या घटनेचा तीव्र निषेध केला.