पुलाची शिरोली / वार्ताहर
पुणे-बंगलोर राष्ट्रीय महामार्गावरील तावडे हॉटेल येथील फाट्यावर पोलिसांनी वाहतुकीची शिस्त लावावी. अशी मागणी वाहनधारकांच्यातून होत आहे . कोल्हापूर शहराचे तावडे हॉटेल हे प्रवेशव्दार आहे. गांधीनगर हे कपड्याची मोठी बाजारपेठ आहे. तेथे कोल्हापूर ,सांगली ,सातारा ,बेळगाव आणि कोकण या प्रमुख जिल्ह्यातील व्यापार्यांची गांधीनगर येथे कपडे , इलेक्ट्रॉनिक वस्तूसह गृहपोयोगी वस्तूंची प्रसिध्द मोठी बाजारपेठ आहे . सध्या दीपावली सणाची धामधूम सुरू आहे .यामुळे गांधीनगर या मुख्य बाजारपेठेत खरेदीसाठी येणारे कोल्हापूर सांगली, सातारा,कोकण व जिल्ह्यातील लहान मोठे व्यापारी व कोल्हापूर परिसरातील किरकोळ ग्राहक कपडे, इलेक्ट्रॉनिक वस्तूसह इतर ग्रहपोयोगी वस्तूंची खरेदी करण्यासाठी मोठ्या प्रमाणात येत आहेत.
या खरेदीसाठी येणाऱ्या वाहनधारकांची संख्याही प्रचंड आहे. यामध्ये घरगुती कार, मालवाहतूक टेम्पो, रिक्षा व मोठे ट्रक या वाहनांची प्रचंड वर्दळ सुरू आहे . यामुळे तावडे हॉटेल फाटा येथे वाहनांची प्रचंड गर्दी होऊन वाहतूक विस्कळीत होत आहे . तसेच वाहनधारकांचीही मोठ्या प्रमाणात कोंडी होऊ लागली आहे . या वाहनांच्या कोंडीमुळे सर्वसामान्य मोटरसायकल वरून प्रवास करणाऱ्या लोकांना त्रास सहन करावा लागत आहे . त्यामुळे वाहतुकीची शिस्त लावण्यासाठी कार्यरत असलेले गांधीनगर पोलिस ठाण्यातील पोलिस कर्मचारी व होमगार्ड हे वाहनांची शिस्त लावण्या ऐवजी अन्य कामात व्यस्त आहेत. याची वरिष्ठांनी दखल घेऊन वाहतुकीची शिस्त लावावी अशी मागणी वाहन धारकांच्यातून होत आहे.