जागतिक वातावरणाचा प्रभाव- निफ्टी घसरणीसह 14,549.40 वर बंद
वृत्तसंस्था / मुंबई
जागतिक बाजारांमधील नकारात्मक वातावरणामुळे समभाग विक्रीचा प्रभाव मजबूत राहिल्याने भारतीय शेअर बाजारात तिसऱया दिवशी बुधवारी सेन्सेक्स 871 अंकांनी घसरला आहे. प्रमुख कंपन्यांपैकी महिंद्रा ऍण्ड महिंद्राचे समभाग सर्वाधिक चार टक्क्यांनी नुकसानीत राहिले आहेत.
प्रमुख कंपन्यांच्या कामगिरीनंतर बुधवारी दिवसअखेर बीएसई सेन्सेक्स 871.13 अंकांनी कोसळून निर्देशांक 49,180.31 वर बंद झाला आहे. दुसऱया बाजूला राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी हा 265.35 अंकांनी घसरुन निर्देशांक 1.79 टक्क्यांच्या नुकसानीसह निर्देशांक 14,549.40 अंकांवर बंद झाला आहे.
सेन्सेक्समधील कंपन्यांमध्ये महिंद्रा ऍण्ड महिंद्राचे समभाग सर्वाधिक चार टक्क्यांनी नुकसानीत राहिले असून यासोबत स्टेट बँक, आयसीआयसीआय बँक, ऍक्सिस बँक, इंडसइंड बँक, आयटीसी आणि एनटीपीसी यांचे समभाग नुकसानीत राहिले आहेत. याच्या बरोबर विरुद्ध बाजूला एशियन पेन्ट्स आणि पॉवरग्रिडचे समभाग लाभात राहिले आहेत.
जागतिक बाजारातील वातावरण हे नकारात्मक राहिल्यासोबत, देशातील कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रभावामुळे गुंतवणूकदारांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले असल्याने याचा परिणाम म्हणून देशातील शेअर बाजार मोठय़ा अंकांन कोसळल्याचे पहावयास मिळाले आहे.
अन्य बाजारांचा कल पाहिल्यास यामध्ये आशियातील चीनचा शांघाय कम्पोजिट, हाँगकाँग,जपानचा निक्की आणि सियोलचा कॉस्पी दोन टक्क्यांनी घसरला आहे. प्रारंभीच्या कामगिरी दरम्यान युरोपीयन बाजार मात्र नुकसानीत राहिला होता. याच दरम्यान जागितक बेंचमार्क बेंट कच्चे तेल 2.78 टक्क्यांच्या वाढीसोबत 62.48 डॉलर प्रति बॅरेलवर राहिल्याची माहिती आहे.
पुन्हा धास्ती कोरोनाची
सध्या कोरोनाची धास्ती पुन्हा वाढत असल्याने जगासह देशातील व्यापारासह अन्य क्षेत्रात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. याचा आता येत्या काळात कोणता परिणाम होणार हे मात्र पहाणे गरजेचे असून त्यानंतरच बाजाराची दिशा कोणती स्थिती प्राप्त करेल हे निश्चित होणार असल्याचे शेअर बाजार अभ्यासकांनी म्हटले आहे.