वैद्यकीय शिक्षणमंत्र्यांची विधानसभेत माहिती
प्रतिनिधी /बेळगाव
कोरोनाच्या तिसऱया लाटेचा सामना करण्यासाठी बिम्स प्रशासन सज्ज आहे. कोरोनाच्या दुसऱया लाटेवेळी आलेल्या तक्रारीवरून बिम्समध्ये अनेक सुधारणा करण्यात आल्या आहेत, अशी माहिती वैद्यकीय शिक्षणमंत्री डॉ. के. सुधाकर यांनी बुधवारी विधानसभेत दिली.
बेळगाव उत्तरचे आमदार अनिल बेनके यांच्या लक्षवेधी सूचनेला उत्तर देताना वैद्यकीय शिक्षणमंत्र्यांनी वरील माहिती दिली. बिम्समध्ये अनेक गैरसोयी होत्या. कर्तव्यात कसूर केलेल्या डॉक्टर व कर्मचाऱयांवर कारवाई करण्यात आली आहे. तिसऱया लाटेचा सामना करण्यासाठी यंत्रणा सज्ज ठेवण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
1 हजार 30 खाटांची क्षमता असलेल्या या इस्पितळात केवळ बेळगावच नव्हे तर शेजारच्या गोवा व महाराष्ट्रातूनही रुग्ण उपचारासाठी येतात. ही गोष्ट लक्षात ठेवून सुधारणा करण्यात आल्या आहेत.
कोरोनाच्या काळात सरकारच्या मार्गसूचींचे पालन न करणाऱया वैद्यकीय अधिकारी डॉ. संजीव कट्टे व सहा परिचारिकांच्या खातेनिहाय चौकशीचा आदेश देऊन त्यांना या संस्थेतून मुक्त करण्यात आले आहे. बिम्सचे तत्कालिन वैद्यकीय संचालक डॉ. विनय दास्तीकोप यांना रजेवर पाठविण्यात आल्याचे वैद्यकीय शिक्षणमंत्र्यांनी सांगितले.
तिसऱया लाटेचा सामना करण्यासाठी बिम्सवर प्रादेशिक आयुक्तांची देखरेख ठेवण्यात आली आहे. डॉ. आर. जी. विवेकी यांची वैद्यकीय संचालकपदी निवड करण्यात आली आहे. अर्थसल्लागारांची नियुक्ती करण्यात आली असून आवश्यक उपकरणांच्या खरेदीसाठी देणग्या मिळविण्यात येत आहेत. वैद्यकीय अधीक्षकपदी डॉ. ए. बी. पाटील यांची निवड करण्यात आली आहे.
रोज किमान एकदा तरी डॉक्टरांनी रुग्णांची भेट घेऊन त्यांच्यावर योग्य उपचार करण्याची सूचना करण्यात आली आहे. प्रत्येक डॉक्टरांनी कामाच्यावेळी ओपीडीमध्ये राहणे गरजेचे आहे, अशी सूचना देण्यात आली आहे. क्रिटिकल केअर वॉर्डमध्ये नर्स ऑन कॉल बर्जर ही व्यवस्था अंमलात आणण्यात आली आहे. रुग्णांना उत्तम दर्जाचे जेवण मिळावे, यासाठी आहारतज्ञांची नियुक्ती करण्यात आली आहे. केएमएफ व हॉपकॉमकडून कमी दरात दूध व दुग्धजन्य पदार्थ, भाजीपाला खरेदी करून रुग्णांना देण्यात येत आहे, अशीही माहिती वैद्यकीय शिक्षणमंत्र्यांनी दिली आहे.
पिडियाट्रिक व्हेंटिलेटरची व्यवस्था
संभाव्य तिसरी लाट लक्षात घेऊन नियोनॅटल व पिडियाट्रिक व्हेंटिलेटरचा संग्रह करण्यात आला आहे. यासाठी स्वतंत्र वॉर्ड तयार करण्यात आले आहेत. प्रत्येक मिनिटाला 1 केएल ऑक्सिजन प्लांटचे नियोजन करण्यात आले आहे. जिनोमिक सिक्वेंसिंग प्रयोगशाळेच्या स्थापनेसाठी आवश्यक तयारी करण्यात आली असून यासाठी बिम्सला 2 कोटी 20 लाख रुपये देण्यात आले आहेत. तिसऱया लाटेच्या पार्श्वभूमीवर खाटांची क्षमता 1 हजार 76 इतकी करण्यात आली असून यामध्ये 846 ऑक्सिजन बेड आहेत. महिला व मुलांसाठी 365 बेड राखीव ठेवण्यात आल्याचे वैद्यकीय शिक्षणमंत्र्यांनी सांगितले.