ऑनलाईन टीम/तरुण भारत
पश्चिम बंगालमध्ये राज्य सरकार आणि राज्यपाल यांच्यातील संबंध मोठ्या प्रमाणावर ताणले गेले आहेत. राज्यातील महत्त्वाच्या दोन व्यक्तींमध्ये कलगीतुरा सुरू असताना एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. राज्यपालांनी शेअर केलेल्या या व्हिडिओमध्ये ममता बॅनर्जी पूर्व मिदनापूरच्या पोलीस अधीक्षकांना थेट राज्यपालांविषयी प्रश्न विचारताना दिसत आहेत. “राज्यपाल तुम्हाला थेट फोन करतात का? काय करा किंवा काय करू नका असे आदेश ते तुम्हाला देतात का? मला माहिती आहे की तुम्ही हे मान्य करणार नाही. पण त्यात तुम्ही नका पडू. तुम्हाला सोपवलेलं काम पार पाडण्याचा प्रयत्न करा. तुम्ही राज्य सरकारसाठी काम करत आहात हे लक्षात ठेवा. अशा गोष्टींना घाबरू नका”, असं ममता बॅनर्जी या अधिकाऱ्यांना बजावत असल्याचं व्हिडीओमध्ये दिसत आहे.