ख्रिश्चन धर्मातून हिंदू धर्मात प्रवेश – लालूंच्या नव्या सुनेचे नाव आता राजेश्वरी
वृत्तसंस्था/पाटणा
राजद नेते आणि बिहारमधील विरोधी पक्षनेते तेजस्वी यादव यांनी हरियाणातील रेचलसोबत विवाह केला आहे. बालपणीच्या मैत्रिणीसोबत विवाह करण्यासाठी तेजस्वी यांना तिची धर्मांतर करण्यासाठी समजूत काढावी लागली आहे. रेचलने विवाहापूर्वी ख्रिश्चन धर्माचा त्याग करत हिंदू धर्माचा स्वीकार केला आहे. याचमुळे तिचे नाव देखील बदलले आहे. लालूप्रसाद यादवांयच कुटुंबात सामील होण्यापूर्वीच रेचल पासून ती आता राजेश्वरी यादव झाली आहे.
लालूप्रसाद आणि राबडीदेवी दोघेही तेजस्वी अन् रेचल यांच्या विवाहाबद्दल आनंदी नव्हते. दोघांचीही या विवाहाला सहमती नव्हती. रेचल हिंदू नसल्यानेच कुटुंबात असहमती होती. याचा चुकीचा राजकीय संदेश जाण्याची भीती राजद अध्यक्षांना सतावत होती असे मानले जात आहे.
या सर्व कारणांमुळेच लालू यादवांच्या कुटुंबात सामील होण्यासाठी रेचलला हिंदू धर्म स्वीकारावा लागला आहे. या धर्मांतरामुळे लालूप्रसाद अन् राबडीदेवी यांची नाराजी कमी झाल्याचे राजदच्या वरिष्ठ नेत्यांचे सांगणे आहे.
हिंदू पद्धतीने तेजस्वी अन् रेचल विवाहबद्ध झाले, या सोहळय़ाला केवळ कुटुंबातील लोकच सामील झाले. पक्षाच्या नेत्यांनाही याचे निमंत्रण मिळाले नव्हते. लालूप्रसाद यादव हेच विवाहसोहळय़ात सामील होण्यासाठी तयार नव्हते. मनधरणीनंतर लालूप्रसाद हे राबडीदेवी यांच्यासह विवाहसोहळय़ात सामील झाल्याचे वृत्त आहे.