ऑनलाईन टीम / रायपूर :
देशात कोरोना व्हायरस धुमाकूळ घालत आहे. त्यातच आता तेलंगणामधून छत्तीसगडमध्ये आलेल्या एका 20 वर्षीय प्रवासी श्रमिकाने क्वारंटाइन सेंटरमध्ये आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे.
या बाबत माहिती देताना गरियाबंदचे अतिरिक्त पोलिस अधीक्षक सुखनंदन राठोड यांनी सांगितले की, देवभोग पोलीस स्टेशनच्या हद्दीतील घोडापाडार गावातील क्वारंटाइन सेंटरमध्ये लोबो राम सारी यांनी फाशी घेतल्याचे आढळून आलेे आहे.
पुढे ते म्हणाले, सारी हे मागील आठवड्यात हैदराबाद मधून आले होते. आणि नियमानुसार त्यांना 14 दिवस क्वारंटाइन सेंटरमध्ये ठेवण्यात आले होते. त्यांच्यामध्ये कोरोना व्हायरसची कोणतीही लक्षणे नव्हती. पण नियमानुसार, त्याचे नमुने कोविड -19 च्या तपासणीसाठी पाठविण्यात आले होते.
दरम्यान, या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून आत्महत्येचे कारण काय याचा तपास सुरू आहे. असेही त्यांनी यावेळी सांगितले.