मुख्यमंत्री चन्नी यांच्या भावाची अवस्था : आता अपक्षाच्या स्वरुपात भरणार अर्ज
क्रिकेटप्रमाणेच राजकारण देखील अनिश्चिततांचा खेळ ठरला आहे. कधी काय होईल कळतच नाहीत. पंजाबचे मुख्यमंत्री चरणजीत सिंह चन्नी स्वतःच्या भावाला तिकीट मिळवून देऊ इच्छित होते, परंतु ते हतबल दिसून आले. स्वतःच्या भावाला ते काँग्रेसची उमेदवारी मिळवून देऊ शकले नाहीत. आता त्यांच्या भावाने अपक्ष म्हणून निवडणूक लढण्याची घोषणा केली आहे.
चन्नींसमोर नवी अडचण
पंजाब विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने उमेदवारांची घोषणा केली आहे. राजकीय जाणकारांनुसार तिकीटवाटपात नवज्योत सिद्धू यांचाच वरचष्मा राहिला आहे. काँग्रेसच्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर झाल्यावर पंजाबच्या मनसा, मोगा, मलोट आणि बस्सी पठाना समवेत अनेक मतदारसंघांच्या नेत्यांमध्ये नाराजी आहे. आता तर चन्नी यांचे भाऊच काँग्रेसच्या विरोधात निवडणूक लढविताना दिसून येणार आहेत.
स्वेच्छानिवृत्तीचे उचलले होते पाऊल
बस्सी पठाना मतदारसंघात स्वतःचे बंधू डॉ. मनोहर सिंह यांना उमेदवारी मिळवून देण्यास चन्नी अपयशी ठरले आहेत. सिंह यांनी अलिकडेच स्वेच्छानिवृत्ती स्वीकारली होती. आदमपूरमधून मुख्यमंत्री स्वतः किंवा नातेवाईकल मोहिंदर केपी यांना उमेदवारी मिळवून देऊ पाहत होते. परंतु तेथेही सिद्धू यांच्या इच्छेनुसार सुखविंर कोटली यांना संधी देण्यात आली. 6 दिवस भाजपमध्ये राहून परतलेले लाडी यांच्यावरही विश्वास दर्शविण्यात आलेला नाही. अबोहर येथून काँग्रेसचे दिग्गज नेते सुनील जाखड निवडणूक लढविणार नाहीत. तेथून त्यांचे पुतणे संदीप जाखड निवडणुकीच्या मैदानात उतरतील. पतियाळा ग्रामीण मतदारसंघात विद्यमान मंत्री ब्रह्म मोहिंदरा यांच्याजागी त्यांचे पुत्र मोहित यांना तिकीट देण्यात आले आहे.
सिद्धू ठरले वरचढ
पंजाब काँग्रेसकडून जारी करण्यात आलेल्या उमेदवारांच्या यादीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नवज्योत सिंह सिद्धू यांचा प्रभाव दिसून येतो. मुख्यमंत्री चरणजीत चन्नी यांच्या मागण्यांना फारसे महत्त्व देण्यात आले नाही. पक्षाने 117 पैकी 86 उमेदवारांची घोषणा केली आहे. कुठल्याही प्रकारचा वाद रोखण्यासाठी काँग्रेसने अमरिंदर सिंह यांच्या निकटवर्तीयांनाही उमेदवारी दिली आहे. पहिल्या यादीत 4 विद्यमान आमदारांना संधी नाकारण्यात आली आहे.
बंडखोरांना स्थान
पहिल्या यादीत सिद्धू, मुख्यमंत्री चन्नी, खासदार प्रताप बाजवा, माजी मुख्यमंत्री राजिंदर कौर भट्टल समवेत सर्व मंत्री आणि आमदारांच्या मतदारसंघातील उमेदवार घोषित करण्यात आले. सिद्धू यांनी सुल्तानपूर लोधी येथे मंत्री राणा गुरजीत यांचे विरोधक नवतेज चीमा, बस्सी पठाना येथे गुरप्रीत जीपी, रायकोट मतदारसंघात आप सोडून काँग्रेसमध्ये सामील झालेले आमदार जगतार जग्गा यांच्या जागी कामिल अमर सिंह तर भटिंडा ग्रामीण मतदारसंघात हरविंदर लाडी यांना तिकीट मिळवून दिले आहे.
सोनू सूदच्या बहिणीला संधी
काँग्रेसने मोगा मतदारसंघात आमदार हरजोत कमल यांना संधी नाकारून बॉलिवूड स्टार सोनू सूदची बहिण मालविकाला उमेदवारी दिली आहे. अशाचप्रकारे अनेक प्रकारच्या विरोधानंतरही वादग्रस्त गायक सिद्धू मूसेवालाला निवडणुकीच्या मैदानात उतरविले आहे. काँग्रेसमध्ये राहून सिद्धू यांना विरोध करणारे मंत्री राणा गुरजीत सिंह यांना पुन्हा कपूरथळा येथून पक्षाची उमेदवारी मिळाली आहे.
कॅप्टन यांच्या समर्थकांना तिकीट
मलोटचे आमदार आणि पंजाब विधानसभेचे उपाध्यक्ष अजैब सिंह भट्टी यांच्याजागी आम आदमी पक्ष सोडून आलेल्या रुपिंदर कौर रुबी यांना तिकीट देण्यात आले आहे. रुबी यापूर्वी भटिंडा ग्रामीण मतदारसंघाच्या आमदार होत्या. बल्लुआनाचे आमदार नाथूराम यांना उमेदवारी नाकारण्यात आली आहे. त्यांच्या जगी राजिंदर कौर यांना संधी देण्यात आली. काँग्रेसने कॅप्टन अमरिंदर यांचे निकटवर्तीय म्हणून मंत्रिपद काढून घेतलेल्या नेत्यांना पुन्हा तिकीट दिले आहे. यात रामपुरा फूलचे आमदार गुरप्रीत कांगड, मोहालीचे बलवीर सिद्धू, होशियारपूरचे शाम सुंर अरोडा, नाभाचे साधू सिंह धर्मसोत यांच्यासह कॅप्टन यांचे सल्लागार राहिलेले कॅप्टन संदीप संधू यांना काँग्रेसने उमेदवारी दिली आहे.