वृत्तसंस्था/तैवान :
कोरोना विषाणूच्या थैमानामुळे जगभरातले सर्व व्यवहार आणि क्रीडा स्पर्धा ठप्प पडल्या आहेत. हे सारे पूर्ववत कधी होईल, हे मात्र अनिश्चित आहे. मात्र अशा परिस्थितीतही चीनचा सख्खा शेजारी असलेल्या तैवानमध्ये बेसबॉलचा हंगाम सुरु झाला आहे. विशेष म्हणजे, चीनमध्ये कोरोनाने थैमान घातले असताना तैवानने कोरोनाला लांब ठेवण्यात यश मिळवले आहे. कोरोनाग्रस्तांची संख्या नियंत्रीत असल्यामुळे तैवानमध्ये शुक्रवारपासून बेसबॉलच्या नव्या हंगामाला प्रारंभ झाला असल्याची माहिती स्थानिक प्रशासनाने दिली. याशिवाय, प्रो बास्केटबॉल व फुटबॉल सामनेही खेळवले जात आहेत.
सध्या तैवानमध्ये कोरोनाग्रस्तांची संख्या नियंत्रित असली तरी भयग्रस्त वातावरण थोडय़ा प्रमाणात असल्याने प्रेक्षकांशिवाय रिकाम्या स्टेडियममध्ये सामने खेळवले जाणार आहेत. पण रिकामे स्टँडस् आणि प्रेक्षकांशिवाय खेळण्यात काय मजा म्हणून एका स्थानिक संघाने नामी योजना आखली आहे. मैदान जरी रिकामे असले तरी सामने पहायला कुणीतरी आहे असा भास होईल असे पुतळे स्टँड्समध्ये ठेवले आहेत. मागील दीड महिन्यापासून कोरोना नियंत्रीत असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर शुक्रवारपासून तैवानमध्ये 31 व्या बेसबॉल मोसमाला सुरूवात झाली. ताईचुंग येथे पहिला सामना चायनाट्रस्ट ब्रदर्स व युनी प्रेसिडेंट संघात झाला. हंगामाला सुरुवात झाली असली तरी हे सामने पाहण्यास चाहत्यांना प्रवेश नाकारण्यात आला आहे. यातच चायनाट्रस्ट या स्थानिक संघाने नामी शक्कल लढवत स्टेडियममध्ये पुतळे व कटआऊट्स बसवले आहेत. तसेच काही पुतळे ड्रमसुध्दा वाजवत असल्याने स्टेडियम अगदी भरगच्च असल्यासारखे वाटत आहे.
कोरोनाचा धसका तरीही खेळाडूंचा बेसबॉल खेळण्याकडे कल
बेसबॉल हा तैवानमधील सर्वात लोकप्रिय खेळ आहे. यंदाच्या मोसमात 240 सामने खेळवण्याचे नियोजन असल्याचे प्रो लीगच्या आयोजकांनी सांगितले. अर्थात, कोरोनाची भीती जरी असली तरी संपूर्ण नियोजनानंतर हंगामाला प्रारंभ केल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले. याशिवाय, चाहत्यांना जरी या प्रवेश नाकारण्यात आला असला तरी सर्व सामन्यांचे लाईव्ह प्रक्षेपण केले जात आहे.
विशेष म्हणजे, संपूर्ण जगभरातील क्रीडा स्पर्धा रद्द झाल्या असल्या तरी तैवानमध्ये मात्र लीग आयोजकांनी काही नामवंत उपाय योजल्याने बेसबॉल हंगामाच्या रुपाने क्रीडा स्पर्धेला सुरुवात झाली असल्याचे पहायला मिळाले. मैदानावर चाहत्यांची उपस्थिती जरी नसली तरी स्पर्धा सुरु झाल्याने एक आशेचा किरण मात्र नक्की पहायला मिळाला आहे.