वार्ताहर / तवंदी :
शिरगुप्पी प्रकरणातील तोतया पोलिसासह बुधवारी रात्री 9.30 वाजता गवाण क्रॉस येथे पाचजणांना अटक करून गुरुवारी त्यांची रवानगी हिंडलगा कारागृहात करण्यात आली. त्यांच्याकडून दुचाकीसह 55 हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. निपाणी शहर पोलिसांनी ही कारवाई केली. महामार्गावरील वाहनांना हे सर्वजण लुटण्याच्या तयारीत असताना ही कारवाई निपाणी शहर पोलिसांनी केल्याचे समजते.
यामध्ये तोतया पोलीस मोहन सुरेश पोवार (वय 20 रा. पावले गल्ली, निपाणी), हरीष पांडूरंग डांगरे (वय 28 रा. आश्रयनगर, निपाणी), मधुकर शंकर निकम (वय 43 रा. दावणे गल्ली, कागल, जि. कोल्हापूर) नंदीश मारुती पुजारी (वय 33 रा. वाळवेकरनगर, हुपरी), अमर आण्णाप्पा बागल (वय 35 रा. वाळवेकरनगर, हुपरी) अशी अटक केलेल्या पाच आरोपींची नावे आहेत.
या प्रकरणाबाबत अधिक माहिती अशी, शिरगुप्पी (ता. निपाणी) प्रदीप मोकाशी यांच्या शेतात गेल्या पाच-सहा दिवसांपूर्वी तोतया पोलिसांसह अन्यजण संशयितरित्या फिरताना दिसत होते. त्यानंतर बुधवारी रात्री 9.30 च्या सुमारास कोल्हापूर-निपाणी महामार्गावर तोतया सदर पाच जण शस्त्रांसह उभे होते. याची माहिती निपाणी शहर पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे जिल्हा पोलीसप्रमुख लक्ष्मण निंबरगी व डीएसपी मनोजकुमार नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली सीपीआय संतोष सत्यनायक, शहर उपनिरीक्षक कुमार हडकर, गुन्हे अन्वेषण विभागाचे उपनिरीक्षक एस. एस. जाधव, ग्रामीणचे उपनिरीक्षक बी. एस. तळवार, एएसआय आर. बी. शेख, हवालदार गजानन भोई, राजू कोळी, पोपट ऐनापूर, उदय कांबळे, विनोद असोदे, एस. एस. चिकोडे, बसवराज नावी यांनी छापा टाकून पाचही जणांना अटक केली.
यावेळी त्यांच्याकडून दोन दुचाकी, दोन चाकू, महाराष्ट्र पोलिसांचा पोषाख, अबकारी खात्याचे आयकार्ड, दोन काठय़ा, दोरी, बॅटरी, इनव्हर्टर असे एकूण 55 हजार रुपयांचे साहित्य जप्त करण्यात आले आहे. त्यांच्यावर कलम 399, 402, 170, 171 आय. पी. सी. नुसार कारवाई करण्यात आली. या आरोपींना शिरगुप्पी येथील शेतातील हौदडय़ात गुप्तधन आहे. असे एका स्वामीने सांगितले. त्याचा देखील या पाच जणांनी शोध घेण्याचा प्रयत्न केला होता. तसेच गवाण क्रॉस येथे महामार्गावरील जाणारी वाहने अडवून त्यांच्याकडून पैसे उकळण्याच्या तयारीत ते तयारीनिशी फिरताना निपाणी शहर पोलिसांनी ही कारवाई केली.
झटपट श्रीमंतीसाठी केले कृत्य
वरील पाच जणांचे टोळके हे झटपट श्रीमंत व्हावे यासाठी धडपडत होते. पण पोलिसांच्या सतर्कतेमुळे त्यांचा हा प्रयत्न फसला. सध्या अनेक युवकांकडून काम नको, पण झटपट श्रीमंत होण्यासाठी असा खटाटोप केला जातो. त्यासाठी युवकांना मार्गदर्शनाची गरज व्यक्त होत आहे.