प्रतिनिधी / गारगोटी
भुदरगड तालुक्यातील आकुर्डे गावी संस्था विलगीकरण कक्षात असलेला मुंबईहुन आलेला एक व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आल्याने तालुक्यासह कोल्हापूर जिल्ह्यात खळबळ माजली होती. प्रशासनाने तातडीने पावले उचलत या पेशंटशी संबंधित आलेल्यांची तपासणी सुरु केली. समाधानाची बाब म्हणजे तपासणीसाठी पाठवलेले विलगीकरण कक्षातील अन्य दोन व त्यांना जेवण पुरवणारे त्यांच्या कुटूंबातील चार व्यक्ती असे सहा व्यक्तींचे व आरोग्य प्रशासनातील 2 व्यक्तींचे रिपोर्ट निगेटिव्ह आल़्याने साऱ्यांनी सुटकेचा सुस्कारा सोडला आहे. यासाठी अहोरात्र दक्षता घेणारे कोरोना दक्षता कमिटी, आरोग्य सेवक , महसूल, पोलीस प्रशासन, अंगणवाडी व अशा स्वयंसेविका अशा सर्वांनी मेहनत घेऊन वेळीच कोरोनाग्रस्त व्यक्तीस विलगीकरण कक्षात ठेवलेमुळे मोठा अनर्थ टळला.
विशेषत: अंधेरी मुंबईहून आकुर्डे गावी आलेल्या या कोरोना पेशंटला ग्रामपंचायत कोरोना नियंत्रण समितीने संपर्क साधून अत्यंत सावधतेने कोरोना संसर्गाचा धोका ओळखून या कोरोना पेशंटला येथील शाळेच्या विलगीकरण कक्षात ठेवले. दरम्यान दहा दिवसानंतर या पेशंटला त्रास सुरु झाल्यानंतर त्याला तात्काळ कोल्हापूर येथे सीपीआर मध्ये पाठविले असता ती व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह निघाली आणि सारा भुदरगड तालुका हादरून गेला. आकुर्डेसह गारगोटी, शेणगाव, महालवाडी, म्हसवे, देवकेवाडी, फये हा सारा परिसर सिलबंद करणेत आला.
याबाबत आकुर्डे कोरोना दक्षता समितीशी संपर्क साधला असता सदर व्यक्तीबाबत तसेच कोरोना संदर्भात प्रत्येक घटनेबाबत समिती अत्यंत जागृत असून योग्य ती खबरदारी घेणेत आली आहे. मुळातच विलगीकरण कक्षातील व्यक्तींच्या संपर्कात कोणीही येऊ नये याची खबरदारी घेणेत आली होती. संशयित व्यक्तींचे रिपोर्ट निगेटिव्ह आलेने संभाव्य धोका टळला आहे. तसेच याबाबतीत ग्रामस्थांनी व तालुक्यातील नागरिकांनी परस्पर कोणतीही चर्चा करू नये तसेच कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये व अफवा पसरवू नये. तसेच अजून काही दिवस गावामध्ये लॉकडाऊन कडक पाळणेच्या सूचना देणेत आल्या असल्याची माहिती आकुर्डे ग्रामपंचायत कोरोना दक्षता कमिटी ने दिली आहे.