उचगांव / वार्ताहर
तावडे हॉटेल चौकात जखमी होऊन निराधार अवस्थेत रस्त्याच्याकडेला पडून राहिलेल्या एका वृद्धासाठी द इंटरनॅशनल ह्यूमन राइट्स संरक्षण परिषदेच्या गांधीनगर शाखेच्या कार्यकर्त्यांनी मानवतेचा हात पुढे केला. त्याला खाजगी रुग्णालयात उपचार करून पुढील उपचारासाठी कोल्हापूर महानगरपालिकेच्या अतिदक्षता विभागात दाखल केले. त्यामुळे त्याच्या जिवाचा धोका टळला. याबाबत गांधीनगर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक भांडवलकर यांनाही याबाबत माहिती दिली. तानाजी शामराव जगताप असे त्याचे नाव असून सांगली जिल्ह्यातील कासेगावलगत असलेल्या येवलेवाडी येथील तो रहिवासी असल्याचे संबंधित वृद्धाने उपचारादरम्यान सांगितले.
गेल्या एक महिन्यापासून हा वृद्ध तावडे हॉटेल चौकामध्ये निराधार अवस्थेत पडून होता. त्याच्या दोन्ही पायाच्या पंजावरून चारचाकी वाहन गेले आहे. त्यामुळे तो जखमी अवस्थेत होता. त्याचे हाल पाहणाऱ्या व्यापारी बांधवांनी द इंटरनॅशनल ह्यूमन राइट्स संरक्षण परिषदेच्या गांधीनगर शाखेच्या कार्यकर्त्यांना या जखमी वृद्धाची कैफियत सांगितली.
त्यानंतर ताबडतोब या संस्थेचे राज्य संपर्कप्रमुख गणेशन थमुथन, राज्य सचिव गणेश देवकुळे व जिल्हाध्यक्ष प्रकाश दळवी व त्यांचे सहकारी अर्जुन बुचडे, सचिन कवाळे, दिपक हुबळीकर, प्रमोद माळवदकर हे तावडे हॉटेल चौकात असलेल्या जखमी वृद्धाजवळ आले. त्याची विचारपूस केली. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून या कार्यकर्त्यांनी त्याच्या उपचाराची तयारी केली. पण त्याच्या पायाला झालेल्या जखमेची व अंगाची दुर्गंधी सुटली होती. त्याच्याजवळ कोणीही क्षणभर उभे राहू शकत नव्हते. मात्र अस्थिपंजर होऊन पडलेल्या व्यक्तीला वाचवण्याचे जे कर्तव्य ह्यूमन राइट्स संरक्षण परिषदेच्या गांधीनगर शाखेच्या कार्यकर्त्यांनी बजावले आहे ते मानवतेला नतमस्तक होऊन प्रेरित करणारे नक्कीच आहे.