महिलांना दिली समजः महिला पोलीस, सामाजिक कार्यकर्त्यांचा पुढाकार
प्रतिनिधी /बेळगाव
मध्यवर्ती बाजारपेठेत काही महिलांच्या हाणामारीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. शरीर विक्रय करणाऱया महिलांची आर्थिक व्यवहारातून तुंबळ हाणामारी झाल्याची ही घटना होती. या घटनेनंतर पोलीस दलाने गुरुवारी अशा महिलांना शोधून त्यांना समज देण्याचे काम हाती घेतले.
महिला पोलीस स्थानकाच्या पोलीस निरीक्षक श्रीदेवी पाटील, महिला तस्करी विरोधी युनिटच्या कौन्सिलर प्रमोदा हजारे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक ललीता पुराणिक, एल. एम. मावरकर, सरोजनी तळवार, ललिता दरुर, गौरी मठद, गदगेम्मा मुद्दनगौडर, के. डी. कल्याणकर, सविता लमाणी, प्रवीणी जाधव आदींसह 15 हून अधिक जणांचा समावेश असलेल्या पथकाने मुख्य बाजारपेठेत ही मोहीम राबविली.
गणपत गल्ली, खडेबाजारमधील व्यापाऱयांची जुनीच मागणी
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओनंतर पोलिसांनी नशेत गोंधळ माजविणाऱया वारांगणांवर कारवाई करावी, अशी मागणी केली जात होती. गणपत गल्ली, खडेबाजार परिसरातील व्यापाऱयांची तर ही जुनीच मागणी आहे. काही वर्षांपूर्वी खडेबाजार पोलिसांना त्यांच्यावर कारवाई करताना लाठीचार्ज करावा लागला होता. हा प्रकार पोलिसांच्याच अंगलट आला होता.
पुर्वानुभव लक्षात घेवून या संबंधीच्या कारवाईसाठी महिला पोलीस मैदानात उतरल्या आहेत. पोलीस आयुक्त डॉ. एम. बी. बोरलिंगय्या, उपायुक्त पी. व्ही. स्नेहा आदी वरि÷ अधिकाऱयांच्या मार्गदर्शनाखाली कांबळी खूट, नरगुंदकर भावे चौक, गणपत गल्ली, खडेबाजार, पांगुळ गल्ली परिसरात मोहीम राबवून तब्बल 25 महिलांना ताब्यात घेण्यात आले.
कर्नाटक पोलीस कायद्यांतर्गत त्यांच्यावर कारवाई
ताब्यात घेतलेल्या सर्व महिलांना महिला पोलीस स्थानकात नेवून त्यांची कौन्सिलिंग करण्यात आली. त्यानंतर कर्नाटक पोलीस कायद्यांतर्गत त्यांच्यावर कारवाई करण्यात आली. पोलिसांनी त्यांना सार्वजनिक सभ्यतेचे धडे दिले. प्रमोदा हजारे यांनी त्यांचे कौन्सिलिंग केले. बाजारपेठेतील उपद्रव कमी करण्यासाठी ही मोहीम राबविण्यात आली आहे.