सदाशिवनगर येथे आरोग्य विभागाचे सर्व्हेक्षण
प्रतिनिधी / बेळगाव
धारावी (मुंबई)हून प्रसुतीसाठी बेळगावला आलेल्या गर्भवती महिलेला कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे सदाशिवनगर परिसरात आरोग्य विभागाने तपासणी वाढविली असून या महिलेच्या थेट संपर्कातील 11 जणांसह एकूण 45 जणांना क्वारंटाईन करण्यात आले आहे, अशी माहिती उपलब्ध झाली आहे.
5 मे रोजी कारमधून ही 27 वषीय महिला मुंबईहून बेळगावला आली आहे. यासाठी ती महिला किंवा तिच्या कुटुंबियांनी ईपास घेतलेले नव्हते. त्यामुळे तिचा पती, भाऊ व कार चालकाविरुध्द येथील एपीएमसी पोलीस स्थानकात एफआयआर दाखल करण्यात आला आहे. आता या महिलेच्या संपर्कातील लोकांचा शोध घेण्यात येत आहे.
मुंबईहून आल्यानंतर ही महिला तपासणीसाठी खासगी इस्पितळात गेली होती. ती सात महिन्यांची गर्भवती आहे. त्यामुळे तपासणीपूर्वी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये जाऊन कोरोना संबंधी तपासणी करुन येण्याचा सल्ला खासगी डॉक्टरांनी दिला होता. त्यामुळे या महिलेला सिव्हिल हॉस्पिटलमध्ये यावे लागले. तिच्यात लक्षणे आढळून आल्याने तीचे स्वॅब तपासण्यात आल्याची माहिती मिळाली आहे.
मुंबईहून आल्यानंतर ही महिला रोज वॉकिंगला घराबाहेर पडायची. परिसरातील अनेकांना भेटण्याबरोबरच तीने बाजारपेठेतही फेरफटका मारला आहे. देवदर्शनासाठीही ती गेली होती. तिच्या कुटुंबातील 11 जण व तिच्या निकटच्या संपर्कातील 35 जण असे एकूण 46 जणांना क्वारंटाईनमध्ये पाठविण्यात आले असून त्यांचे स्वॅब तपासणी करण्यात येणार आहे.