वृत्तसंस्था/ पॅरीस (फ्रान्स)
सध्या येथे सुरू असलेल्या प्रेंच खुल्या आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या महिला बॅडमिंटनपटू त्रीसा जॉली आणि गायत्री गोपीचंद यांचे महिला दुहेरीतील आव्हान संपुष्टात आले. त्याचप्रमाणे या स्पर्धेत इशान भटनागर आणि तनीषा क्रेस्टो यांनाही मिश्र दुहेरीत पहिल्याच फेरीत हार पत्करावी लागली.
महिला दुहेरीच्या पहिल्या फेरीतील सामन्यात थायलंडच्या जे. किटीथेराकुल आणि पी. रविंदा या जोडीने भारताच्या त्रीसा जॉली आणि गायत्री गोपीचंद यांचा 23-21, 22-20 असा पराभव करत दुसऱया फेरीत प्रवेश मिळविला. त्याचप्रमाणे मिश्र दुहेरीच्या पहिल्या फेरीतील सामन्यात जपानच्या के. येमाशिता आणि शिनोया यांनी इशान भटनागर आणि तनीषा क्रॅस्टो यांचा 21-13, 21-16 असा पराभव केला. सदर स्पर्धा 25 ऑक्टोबरपासून सुरू झाली असून 30 ऑक्टोबरला संपणार आहे.