वृत्तसंस्था/ सेंट जॉर्ज, ग्रेनेडा
रविवारी येथे झालेल्या पाच सामन्यांच्या टी-20 मालिकेतील दुसऱया सामन्यात दक्षिण आफ्रिकेने यजमान विंडीजचा 16 धावांनी पराभव करून 1-1 अशी बरोबरी साधली. या मालिकेतील पहिला सामना विंडीजने जिंकला होता. दक्षिण आफ्रिकेच्या जॉर्ज लिन्डेला ‘सामनावीर’ पुरस्कार देण्यात आला.
या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना दक्षिण आफ्रिकेने 20 षटकांत 7 बाद 166 धावा जमविल्या त्यानंतर विंडीजने 20 षटकांत 9 बाद 150 धावापर्यंत मजल मारल्याने त्यांना हा सामना 16 धावांनी गमवावा लागला. या मालिकेतील तिसरा सामना सेंट जॉर्ज ग्रेनेडा येथे मंगळवारी खेळविला जाणार आहे.
दक्षिण आफ्रिकेच्या डावात सलामीच्या हेन्रिक्सने 30 चेंडूत 1 षटकार आणि 5 चौकारांसह 42 धावा जमविताना डि कॉकसमवेत पहिल्या गडय़ासाठी 6.5 षटकांत 73 धावांची भागिदारी केली. डि कॉकने 20 चेंडूत 2 षटकार आणि 2 चौकारांसह 26 धावा जमविल्या. कर्णधार बवुमाने 33 चेंडूत 1 षटकार आणि 5 चौकारांसह 46 धावांचे योगदान दिले. मिलरने 10 चेंडूत 1 चौकारांसह 11, क्लासेनने 11 चेंडूत 10 धावा जमविल्या. दक्षिण आफ्रिकेच्या डावात 4 षटकार आणि 13 चौकार नोंदविले गेले. विंडीजतर्फे सिंक्लेअरने 23 धावांत 2 तर मॅकॉयने 25 धावांत 3 तसेच होल्डर आणि रसेल यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला.
प्रत्युत्तरादाखल खेळताना विंडीजच्या डावात सलामीच्या फ्लेचरने 36 चेंडूत 1 षटकार आणि 2 चौकारांसह 35, लुईसने 16 चेंडूत 1 षटकार आणि 3 चौकारांसह 21, होल्डरने 20 चेंडूत 1 षटकारांसह 20, ऍलेनने 12 चेंडूत 5 षटकारांसह 34, डी. ब्रॅव्होने 10 चेंडूत 10, पुरणने 1 चौकारांसह 9, ख्रिस गेलने 1 चौकारांसह 8 धावा जमविल्या. विंडीजच्या डावात 8 षटकार आणि 6 चौकार नोंदविले गेले. दक्षिण आफ्रिकेतर्फे रबाडाने 37 धावांत 3, लिन्डेने 19 धावांत 2 तसेच एन्गिडी, नॉर्त्जे आणि शम्सी यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला. विंडीजच्या डावातील शेवटचे षटक एन्गिडीने टाकले. या षटकांत विंडीजला विजयासाठी 36 धावांची जरूरी होती. विंडीजच्या ऍलेनने या शेवटच्या षटकांतील पहिल्या दोन चेंडूवर सलग दोन षटकार ठोकले. त्यावेळी दक्षिण आफ्रिकेवर थोडे दडपण आले होते. पण एन्गिडीने या षटकांतील पाचव्या चेंडूवर ऍलेनला पायचीत करत विंडीजचे आव्हान संपुष्टात आणले.
संक्षिप्त धावफलक ः दक्षिण आफ्रिका – 20 षटकांत 7 बाद 166 (हेन्रिक्स 42, डि कॉक 26, बवुमा 46, मिलर 11, क्लासेन 10, रबाडा नाबाद 7, मॅकॉय 3-25, सिंक्लेअर 2-23, होल्डर 1-26, रसेल 1-18). विंडीज 20 षटकांत 9 बाद 150 (लुईस 21, फ्लेचर 35, गेल 8, पुरन 9, पोलार्ड 1, रसेल 5, होल्डर 20, ऍलेन 34, डी. ब्रॅव्हो 10, रबाडा 3-37, लिन्डे 2-19, एन्गिडी 1-49, नॉर्त्जे 1-27, शम्सी 1-16).