प्रतिनिधी / बेळगाव
शहराच्या दक्षिण भागात पाणीपुरवठा करणाऱया घुमटमाळ जलकुंभाची जलवाहिनी खराब झाल्याने दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले आहे. त्यामुळे पाणी पुरवठय़ात व्यत्यय निर्माण झाला आहे. शहापूर, वडगाव आणि जुने बेळगाव, खासबाग परिसरात एक दिवस उशिरा पाणीपुरवठा करण्यात येणार असल्याचे पत्रक पाणीपुरवठा मंडळाने प्रसिद्ध केले आहे. लक्ष्मीटेकडी जलशुद्धीकरण केंद्र ते घुमटमाळ जलकुंभाला जाणाऱया जलवाहिनीच्या दुरुस्तीचे काम सोमवारपासून सुरू करण्यात आले आहे. बसवेश्वर चौक ते चंपाबाई भोगले, बालिका आश्रम पर्यंतच्या रस्त्यावर जलवाहिनीची दुरुस्ती करण्यात येत आहे. त्यामुळे लक्ष्मी टेकडी जलशुद्धीकरण केंद्रातून घुमटमाळ येथे करण्यात येणारा पाणीपुरवठा बंद ठेवण्यात आला होता. त्यामुळे घुमटमाळ येथून पाणीपुरवठा करण्यात येणाऱया परिसरात पाणीपुरवठा एक दिवस उशिरा होणार असल्याचे मंडळाने कळविले असून, नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.