वृत्तसंस्था/ बेंगळूर
प्रो कबड्डी लिग स्पर्धेत गुरुवारी येथे झालेल्या सामन्यात नवीनकुमारच्या शानदार कामगिरीच्या जोरावर दबंग दिल्लीने पुणेरी पलटनचा 41-30 अशा गुणांनी पराभव करत विजयी सलामी दिली. दिवसातील शेवटच्या सामन्यात पाटणा पायरेट्सने हरियाणा स्टीलर्सवर 42-39 अशा गुणांनी निसटता विजय मिळविला.
दबंग दिल्ली आणि पुणेरी पलटन यांच्यातील सामन्यात दिल्ली दबंग संघातील प्रमुख रायडर नवीनकुमारने शानदार कामगिरी करताना सर्वाधिक म्हणजे 16 गुण नोंदविले. दिल्ली संघातील विजयने 9 गुण नोंदवित नवीनकुमारला चांगली साथ दिली. या सामन्यात दिल्लीचा नवीनकुमार आणि पुणे संघातील राहुल चौधरी यांच्यातच खरी चुरस पहावयास मिळाली. सामन्यातील मध्यंतरापर्यंत दिल्लीने पुणेरी पलटनवर 22-15 अशी आघाडी घेतली होती. सामन्याच्या उत्तरार्धात दिल्ली दबंगची आघाडी केवळ 4 गुणांची राहिली होती. पण नवीनकुमारच्या आक्रमक खेळामुळे दबंग दिल्लीने पुणे संघावर दडपण राखत अखेर हा सामना जिंकला.
या स्पर्धेतील गुरुवारी झालेल्या शेवटच्या अटीतटीच्या सामन्यात पाटणा पायरेट्सने हरियाणा स्टीलर्सचा 42-39 अशा गुणांनी निसटता पराभव केला. या सामन्यात उत्तरार्धातील खेळाच्या शेवटच्या पाच मिनिटांमध्ये पाटणा संघातील खेळाडूंनी आक्रमक चढाया करत महत्त्वाचे तीन गुण मिळविल्याने हरियाणा स्टीलर्सचे आव्हान संपुष्टात आले. मध्यंतरापर्यंत हरियाणाने पाटणा संघावर 22-18 अशी आघाडी घेतली होती. पाटणा संघातील मोनू गोयत तसेच हरियाणा संघातील रोहित गुलिया यांचा खेळ अधिक चमकदार झाला.