पहिले रेल्वेगेट ते स्वीमिंग पूलपर्यंत सर्वाधिक दर
गंगाधर पाटील / बेळगाव
बेळगाव शहरातील एक महत्त्वाचा उपविभाग म्हणून टिळकवाडीकडे पहिल्यापासूनच पाहिले जाते. टिळकवाडी म्हणजेच ठळकवाडी. या ठिकाणी शहरातील ठळक व्यक्ती म्हणजेच मोठे उद्योजक, अधिकारीवर्ग तसेच उच्चभ्रूवर्ग राहतो. त्यामुळे टिळकवाडीला पहिल्यापासूनच अधिक महत्त्व आहे. ब्रिटिशांनी वसविलेले उपनगर अशी ओळख या भागाला आहे. टिळकवाडीमधील जागांच्या दरामध्येही दिवसेंदिवस वाढच होत आहे. या परिसरातील सर्वात महागडा रस्ता म्हणून शुक्रवारपेठचा उल्लेख करावा लागेल. गोवावेस स्वीमिंग पूल ते पहिले रेल्वेगेटपर्यंतच्या या भागात निवासी महालमत्तांचा दर 4 हजार 500 रुपये तर व्यापारी जागांसाठी 6 हजार 300 रुपये प्रति चौ. फूट असा झाला आहे.
त्या खालोखाल सोमवारपेठेचा दर असून सर्व पेठांमध्ये शुक्रवारपेठ प्रथम तर सोमवारपेठ दुसऱया क्रमांकावर येते. सोमवार पेठेतील निवासी मालमत्तांचा दर 4 हजार रुपये प्रति चौ. फूट तर व्यावसायिक जागांसाठी 5 हजार 600 रुपये प्रति चौ. फूट असा आहे. टिळकवाडीतील मुख्य रस्ता आणि वर्दळीचा रस्ता असलेला खानापूर रोड तिसऱया क्रमांकावर येतो. या रस्त्याचे निवासी दर 3 हजार 940 रुपये प्रति चौ. फूट तर व्यावसायिक जागांचा दर 5 हजार 516 रुपये प्रति चौ. फूट निश्चित करण्यात आले आहेत.
टिळकवाडीमध्ये जागा मिळणे अवघडच आहे. गेल्या काही वर्षांमध्ये टिळकवाडी परिसरात अपार्टमेंट बांधण्याचे प्रमाण वाढले आहे. या भागातील जुनी घरे गेली आणि अपार्टमेंट झाली. यामुळे फ्लॅटची मागणीही वाढली आहे. जनतेचा कलही अपार्टमेंटकडे वाढला असून त्याला प्राधान्य देण्यात येत आहे. कारण खुली जागा मिळणे दुरापास्त झाले आहे.
टिळकवाडीमधील जागांचे दर 1997 मध्ये कमी होते. निवासी मालमत्तांचे दर केवळ 111 रुपये प्रति चौ. फूट तर व्यापारी जागांचे दर 213.07 प्रति चौरस फूट होते. तेच दर 2007 साली सहा पटीने वाढून निवासी मालमत्तांचे दर 720 रुपये प्रति चौ. फूट तर व्यापारी जागांचे दर 820 प्रति चौ. फूट निश्चित करण्यात आले. त्यानंतर आता 13 वर्षांनी म्हणजेच 2020 मध्ये निवासी मालमत्तांचा दर 4 हजार 500 रुपये प्रति चौ. फूट तर व्यापारी मालमत्तांचे दर 6 हजार 300 रुपये प्रति चौ. फुटांवर निश्चित केला आहे. त्यामुळे येथील दरांनी उच्चांकी गाठली असून या माध्यमातून उपनोंदणी कार्यालयानेही अधिक कर जमा केल्याचे दिसून येत आहे.
टिळकवाडीतील आगरकर रोड आणि काँग्रेस रोडचे निवासी मालमत्तांचा दर 3 हजार 438 रुपये प्रति चौ. फूट निश्चित करण्यात आला आहे. येथील व्यापारी जागांचा दर 5 हजार 07 रुपये प्रति चौ. फूट निश्चित केला आहे. त्यानंतर गुरुवारपेठ, मंगळवारपेठ, बुधवारपेठ, शुक्रवारपेठ येथील निवासी मालमत्तांचे दर 2 हजार 900 रुपये प्रति चौ. फूट आहे. व्यापारी जागांचे दर 4 हजार 10 रुपये निश्चित करण्यात आले आहेत. आरपीडी रोडवरील निवासी मालमत्तांचा दर 2 हजार 360 रुपये प्रति चौ. फूट तर व्यापारी जमिनींचा दर 3 हजार 304 रुपये प्रति चौ. फूट निश्चित करण्यात आला आहे.
टिळकवाडी परिसराचा विस्तार वाढत चालला आहे. येथील रस्त्यांचे रुंदीकरण तसेच काँक्रिटीकरण सुरू आहे. विविध मॉल या ठिकाणी झाले आहेत. याच बरोबर खानापूर रस्त्याचे रुंदीकरण झाल्यानंतर या परिसराचे महत्त्व आणखीनच वाढले आहे. या परिसरात पूर्वी कौलारू घरे होती. त्या ठिकाणी आता मोठमोठी अपार्टमेंट उभी राहिली आहेत. स्वीमिंग पूलपासून पहिल्या रेल्वेगेटपर्यंत तर विविध शोरुम झाल्यामुळे या रस्त्याला लागून असलेल्या खुल्या जागांचे दर झपाटय़ाने वाढू लागले आहेत. मुद्रांक व नोंदणी खात्यानेदेखील याबाबत सर्वेक्षण करून वाढीव बाजारमूल्यांचा तक्ता जाहीर केला आहे.
अतिशय शांत वातावरण आणि सर्व प्रकारच्या सोयीसुविधा उपलब्ध असल्याने टिळकवाडीत राहणे अनेक जण पसंत करतात. विशेषतः ज्या प्रमाणे टिळकवाडी येथील नागरिक मोठय़ा प्रमाणात पुणे-मुंबईला स्थलांतरित झाले त्याचप्रमाणे संबंधित शहरांतून येथे येऊन वास्तव्य करणाऱयांचे प्रमाणही अधिक आहे. यामुळेच दराचा तक्ता वाढतच चालला आहे.