प्रतिनिधी/ बेळगाव
कोरोनाच्या संकटछायेत सुरू असणाऱया दहावी परीक्षेचे दोन पेपर पार पडले असून तिसरा पेपर सोमवार दि. 29 रोजी होणार आहे. नियोजित वेळापत्रकानुसार सकाळी 10.30 ते 1.45 दरम्यान विज्ञान विषयाचा पेपर पार पडणार आहे. विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी, थर्मल स्क्रिनिंग करूनच विद्यार्थ्यांना केंद्रात प्रवेश देण्यात येणार असल्याने विद्यार्थ्यांना केंद्रावर लवकर उपस्थित राहावे लागणार आहे.
दि. 25 जूनपासून परीक्षेला प्रारंभ झाला असून तीन महिन्यांच्या कालावधीनंतर सुरू झालेल्या या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी पुरेसा वेळ मिळाला आहे. त्यानुसार पहिले दोन पेपर एक दिवस पेपर एक दिवस सुटी याप्रमाणे पार पडले असून द्वितीय भाषा व गणित विषयानंतर सोमवारी विज्ञान विषयाचा पेपर पार पडणार आहे. त्यानंतर 30 रोजी सुटी असून 1 जुलैपासून सलग समाज विज्ञान, प्रथम भाषा व 3 जुलै रोजी तृतीय भाषा विषयाच्या पेपरने परीक्षेची समाप्ती होणार आहे.
15 मिनिटांचा वेळ अधिक
प्रश्नपत्रिकेचे स्वरुप बदलले असल्याने परीक्षेचा वेळ वाढविण्याची मागणी करण्यात आली होती. यामुळे भाषा विषय सोडून इतर तीन पेपरांना 15 मिनिटांचा वेळ वाढवून देण्यात आला आहे. वस्तुनि÷ प्रश्नांबरोबरच यंदा आकलन, उपयोजनात्मक अर्थात लेखनावर भर देणाऱया प्रश्नांना प्राधान्य देण्यात आले आहे. यामुळे विद्यार्थ्यांना वेळ वाढवून देण्यात आला आहे. गणित, विज्ञान, समाज विज्ञान, प्रथम भाषा या चार विषयांसाठी 3 तास 15 मिनिटांचा वेळ देण्यात आला आहे.