चौकशी समितीचा निर्णय
प्रतिनिधी / पणजी
दहावीच्या इंग्रजी पेपरातील वादग्रस्त प्रश्नाबाबत राज्य सरकारने नेमलेल्या चौकशी समितीची बैठक होऊन त्या प्रकरणी सखोल तपासकाम करण्याचे ठरवण्यात आले आहे. तसेच आगामी आठ दिवसात अहवाल देण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती गोवा शिक्षण मंडळाच्या सूत्रांनी दिली.
भ्रष्टाचार, पोर्तुगीज पासपोर्ट व इतर काही वादग्रस्त विषयावरील वादग्रस्त प्रश्न दहावीच्या परीक्षेच्या मे महिन्यात झालेल्या इंग्रजी पेपरमधून विचारण्यात आले होते. त्यावरून बरीच खळबळ माजली होती. तेव्हा सरकारने शिक्षण मंडळामार्फत चौकशी समिती नेमून त्याचा तपास करण्याचे ठरवण्यात आले. परंतु अजून तपासकाम पूर्ण झालेले नाही.
या प्रकरणी 4 शिक्षकांना नोटिस बजावून त्यांना स्पष्टीकरण देण्यास सांगितले होते. दहावीची परीक्षा संपल्यानंतर त्यासंदर्भात काय ते ठरवू असे त्यावेळी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सांगितले होते. परंतु अद्याप काहीच ठरले नसल्याचे समोर आले आहे. शिक्षण मंडळाच्या चौकशी समितीच्या काल शुक्रवारी झालेल्या बैठकीत या प्रकरणी अधिक खोलात जाऊन तपास करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आगामी 8 दिवसात ठोस निकाल लावण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.