बोर्डाचे सचिव गेराल्डिना मेंडीस यांची सूचना
प्रतिनिधी / पणजी
गोवा माध्यमिक – उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने (गोवा बोर्ड) परिपत्रक जारी केले असून दहावी – बारावी परीक्षेच्या नवीन तारखा 15 दिवसांची पूर्व मुदत देऊन जाहीर करण्यात येणार असल्याचे कळविले आहे. बोर्डाचे सचिव गेराल्डिना मेंडीस यांनी सदर परिपत्रक काढून सर्व शाळा – उच्च माध्यमिक शाळांना पाठवले आहे.
सरकारच्या निर्देशानुसार कोरोना महामारीचे संकट तसेच मुलांची सुरक्षा लक्षात घेऊन दहावी – बारावीच्या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या असून नवीन तारखा कोरोनाची परिस्थिती वस्तुस्थिती पाहून निश्चित करण्यात येतील. बारावीची परीक्षा 24 एप्रिलपासून तर दहावीची परीक्षा 13 मे पासून चालू करण्याचे ठरविले होते. तथापि आता ते वेळापत्रक स्थगित करण्यात आले आहे. बारावी परीक्षेसाठी सुमारे 19247 जणांनी नावनोंदणी केली असून दहावी परीक्षेसाठी 24300 जणांची नोंदणी झाली आहे. परीक्षा पुढे गेल्यामुळे विद्यार्थ्यांना अभ्यास परीक्षेच्या तयारीसाठी जादा दिवस मिळणार असून त्याचा त्यांना फायदा होणार आहे. परीक्षा पुढे गेल्यामुळे त्यांचे निकालही उशिराने लागणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. परिणामी पुढील शिक्षणाचे प्रवेश – नवे शैक्षणिक वर्ष सुरु होण्याचा कालावधी जुलैपर्यंत लांबणार, अशी चिन्हे दिसत आहेत.