विद्यार्थ्यांना अनुकूल : परीक्षा जुलैच्या आठवडय़ात होण्याची शक्यता
प्रतिनिधी /बेंगळूर
कोरोना परिस्थिती नियंत्रणात आल्यानंतर जुलैच्या शेवटच्या आठवडय़ात दहावी विद्यार्थ्यांची परीक्षा घेतली जाणार आहे. विद्यार्थ्यांना सरावासाठी काही दिवसांपूर्वी शिक्षण खात्याने गणित, विज्ञान आणि समाज विषयांची नमुना प्रश्नपत्रिका वेबसाईटवर प्रसिद्ध केली होती. आता शुक्रवारी भाषा विषयांची प्रश्नपत्रिका उपलब्ध करण्यात आली आहे.
यंदा दहावी परीक्षेच्या स्वरुपात बदल करण्याचा निर्णय शिक्षण खात्याने घेतला आहे. भाषा विषयांची एक आणि समाज, गणित, विज्ञान विषयांची एक अशा दोन प्रश्नपत्रिका विद्यार्थ्यांसाठी असतील. दोन दिवस होणाऱया परीक्षेत प्रत्येक विषयाला प्रत्येकी 40 गुण असतील. म्हणजेच एक पेपर एकूण 120 गुणांचा असणार आहे. तर प्रश्न बहुपर्यायी उत्तरांच्या स्वरुपातील असणार आहेत. त्यांची योग्य उत्तरे विद्यार्थ्यांना ओएमआर शीटवर नमूद करावी लागतील.
प्रथमच अशा पद्धतीने परीक्षा होणार असल्याने सार्वजनिक शिक्षण खात्याने www.sslc.Karnataka.gov.in या वेबसाईटवर विद्यार्थ्यांच्या सरावासाठी नमुना प्रश्नपत्रिका अपलोड केल्या आहेत. काही दिवसांपूर्वी सर्व माध्यमाच्या विद्यार्थ्यांसाठी इतर विषयांच्या प्रश्नपत्रिका उपलब्ध केल्या होत्या. आता शुक्रवारी प्रथम भाषा, द्वितीय भाषा आणि तृतीय भाषांचा समावेश असणारी प्रश्नपत्रिका अपलोड केली आहे. शिक्षकांना देखील विद्यार्थ्यांकडून प्रश्नपत्रिका सोडवून घेण्याची सूचना करण्यात आली आहे.