प्रतिनिधी / पणजी
काँग्रेस विधीमंडळ पक्ष भाजपमध्ये विलीन करण्यात येत असल्याचे खोटे दस्तऐवज तयार करून भाजपात गेलेल्या दहा फुटीर आमदारांविरुद्ध गुन्हा नोंदवा, अशी मागणी करत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी आता पोलीस अधीक्षकांकडे धाव घेतली आहे. सभापती राजेश पाटणेकर यांनी या दहा फुटीर आमदारांविरुद्धची अपात्रता याचिका फेटाळल्यानंतर चोडणकर यांनी काही दिवसांपूर्वी पणजी शहर पोलिसात तक्रार दाखल केली होती. परंतु पणजी पोलिसांनी कोणतीच कारवाई केली नसल्यामुळे चोडणकर आता पोलीस अधीक्षकांकडे पोहोचले आहेत. सदर दहा आमदार आणि अन्य 55 पदाधिकाऱयांनी संगनमत करून विलिनीकरण ठरावाचे खोटे दस्तऐवज तयार करुन ते सभापतींना सादर केले. काँग्रेस विधीमंडळ पक्ष भाजपमध्ये विलीन करण्यात येत असल्याच्या ठरावाचे खोटे दस्तऐवज तयार केल्याचाही दावा चोडणकर यांनी केला आहे.