प्रतिनिधी / लांजा
हॉटेलसमोर पार्क केलेल्या अल्टो कारमधील 2 लाख 42 हजार रुपयांच्या दागिन्यांची पर्स चोरटय़ांनी चोरल्याची घटना सोमवारी सायंकाळी 7.30 ते रात्री 9 च्या दरम्यान लांजा तालुक्यातील कुवे येथे घडली. या चोरीच्या गुह्याचा तपास अद्याप लागू शकला नाही.
लांजा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रतन रामचंद्र डोईफोडे (40 जानवली, तालुका कणकवली) या सोमवारी, 11 जानेवारी रोजी पती व मुलांसह अल्टो कारमधून (एम. एच. 07-क्यू -4492) रत्नागिरी येथून कणकवलीकडे परतीचा प्रवास करीत होत्या. सायंकाळी 7.30 च्या दरम्यान त्या कुवे गणपती मंदिर येथील आर्यप्रसाद हॉटेलमध्ये जेवणासाठी थांबल्या. यावेळी त्यांनी आपली कार हॉटेलसमोर पार्क केली होती. जेवण झाल्यानंतर रात्री 9 च्या दरम्यान हे कुटुंब हॉटेलमधून बाहेर पडले. यावेळी त्यांना कारच्या मागील दरवाजाची काच फोडल्याचे व सीटवर ठेवलेली दागिन्यांची पर्स गायब झाल्याचे दिसले. याची माहिती त्यांनी हॉटेल मालक व खबर लांजा पोलीस ठाण्यात दिली. या पर्समध्ये 1 लाख 40 हजार रुपयांचे 35 ग्रॅम सोन्याचे मंगळसूत्र, 40 हजार रुपयांचा दहा ग्रॅम सोन्याचा नेकलेस, 12 हजार रुपयांच्या रिंग्स, 10 हजार रुगयांची 2.5 ग्रॅम वजनाची चेन असे एकूण 2 लाख 42 हजार रुपये किंमतीचे दागिने असलेली पर्स अज्ञात चोरटय़ांनी लंपास केली.
या प्रकरणी लांजा पोलीस ठाण्यात भा.दं.वि. कलम 379, 427 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस निरीक्षक अनिल गंभीर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सुनील चवेकर करीत आहेत. अज्ञात चोरटय़ांनी लांबवलेली दागिन्यांची रिकामी पर्स हॉटेलपासून 3 किलोमीटर अंतरावर शासकीय विश्रामगृह लांजाच्या परिसरात पोलिसांना आढळली आहे.