राधानगरी /प्रतिनिधी
गेल्या पंधरा दिवसा पासून कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे जिल्हा प्रशासनाने सर्व पर्यटन स्थळे व अभयारण्य बंद केली होती, त्यामुळे येथील स्थानिक नागरिक, हॉटेल व्यावसायिक व जंगल सफारी गाड्या व स्थानिकच्या गाईड यांच्यावर बेरोजगारी निर्माण झाली होती, त्या अनुषंगाने जिल्हा प्रशासनाने पुन्हा एकदा अभयारण्य खुले करण्याचा निर्णय घेतला आहे.
राधानगरी दाजीपूर जंगल सफारी व सर्व पर्यटन स्थळे उद्या 26 जानेवारी पासून पुन्हा सुरु होत आहेत. राधानगरी डॅम, काळामवाडी डॅम, फुलपाखरू गार्डन, देवराई, राऊंतवाडी धबधबा ही सर्व ठिकाणे उद्यापासून पर्यटकांसाठी सुरु होत आहेत. लसीचे दोन डोस पूर्ण झालेल्या व्यक्तींनाच प्रवेश मिळणार आहे. कोव्हिड 19 च्या सर्व नियमांचे काटेकोर पालन करावे लागणार आहे. नुकतेच जंगलातील प्राणीगणनेमध्ये प्राण्यांच्या संख्येत लक्षणीय वाढ दिसत आहे, त्यामुळे जंगल सफारीला पुन्हा सुरवात होणार असल्याने पर्यटकांना त्याचा आनंद घेता येणार आहे.