प्रतिनिधी / दापोली
ग्रामपंचायत सरपंच पदासाठी सन २०२० ते २०२५ या कालावधीसाठी आरक्षण सोडतीबाबत सभा १५ डिसेंबर रोजी दापोली शहरातील नवभारत छात्रालय, शिंदे गुरुजी सभागृह, दापोली येथे सकाळी ११.०० वाजता होणार होती. मात्र सरपंच आरक्षण सोडत ही त्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीनंतर घ्यावी असे शासनाचे निर्देश असल्याने सदर कार्यक्रम हा स्थगित करण्यात आला आहे. यामुळे सदर कार्यक्रम आयोजित करणाऱ्या प्रशासनाची चर्चा तालुक्यात रंगली आहे.
जिल्हाधिकारी रत्नागिरी यांचेकडील दिनांक ०२ डिसेंबर २०२० चे आदेशानुसार अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, नागरीकांचा मागास प्रवर्ग, सर्वसाधारण स्त्री इत्यादी प्रवर्गाचे आरक्षण तरी सदर सरपंच पदाच्या आरक्षणाचे सभेला सर्व सरपंच,ग्रा. पं. सदस्य व संबंधितांनी उपस्थित रहावे असे आवाहन दापोली तालुक्याच्या तहसीलदार वैशाली पाटिल यांनी केले होते. मात्र आता त्यांनीच सदर कार्यक्रम स्थगित झाला असून हा कार्यक्रम ग्राम पंचायत निवडणुकीनंतर म्हणजे 15 जानेवारी नंतर होईल असे जाहीर केले आहे.