वार्ताहर/ मौजेदापोली
सामायिक जागेची वाटणी झालेली नसतानाही खोटे व बनावट कागदपत्र तयार करून खरेदीखत केल्याचा प्रकार दापोली तालुक्यातील चंद्रनगर येथे घडला. या प्रकरणी अनंत मिसाळ यांनी मंगळवारी सख्या भावाविरोधात दापोली पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली आहे. यामुळे खळबळ उडाली असून बनावट कागदपत्रे करून जागा जमिनींचे व्यवहार करणाऱयांचे धाबे दणाणले आहेत. या बाबतच्या दोन प्रकारात सातजणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
दापोली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मनाली कानिटकर (57, ठाणे), सुनील मिसाळ (60, चंद्रनगर), मधुकर आईनकर (65, लाडघर), केशव पेंडसे (पुणे), महेश भागवत (डोंबिवली) अशी या प्रकरणातील आरोपींची नावे आहेत. सुनील मिसाळ यांची दापोली चंद्रनगर येथे सामायिक जमीन असून त्याचे अद्याप वाटप झालेले नाही. 4 ऑगस्ट 2008 रोजी फिर्यादी अनंत मिसाळ यांच्या नावे असलेल्या मौजे चंद्रनगर येथील वरकस जमीन मिळकत सर्वे नं. 116/2 साठी आरोपी सुनील व मधुकर यांनी संगनमत करून खोटे व बनावट खरेदीखत बनवले. हे खरेदीखत बनवण्यासाठी सुनील मिसाळ यांनी 12 जुलै 2009 रोजी खोटे मुखत्यारपत्र देऊन त्यावर मधुकर आईनकर यांनी स्वतःचा फोटो चिकटवून तो जमीन मालक अनंत मिसाळ असल्याचे भासवून खोटे व बनावट कागदपत्र तयार केले. त्यावर केशव पेंडसे व महेश भागवत यांनी ओळखीची व्यक्ती म्हणून सही केली. सही करणारे पेंडसे व भागवत यांना फिर्यादी व्यक्तीशः ओळखत नाहीत. तरी या सर्वांनी संगनमाने अनंत मिसाळ यांच्या जमिनीचे खोटे व बनावट कागदपत्र तयार केल्याने न्यायालयात 15 डिसेंबर 2020 रोजी न्यायालयात दावा दाखल करण्यात आली होता. या दाव्यामध्य कोर्टाने सीआरपीसी 156(3) प्रमाणे तपास करण्याचा व अहवाल दाखल करण्याचा आदेश केला आहे.
फिर्यादी अनंत मिसाळ यांची सामायिक असलेली सर्वे नं. 116 भू. उप. क्र. 37 या जमिनीचेही खोटे व बनावट कागदपत्रे तयार करून खरेदीखत करण्यात आले आहे. दुसऱया जागेच्या प्रकरणात मनाली कानिटकर, (ठाणे), सुनील मिसाळ (चंद्रनगर), मधुकर आईनकर (लाडघर), विजय गोरीवले (दापोली) महेश भागवत, सचिन डोंगरकर (जालगाव) अशी आरोपींची नावे आहेत. फिर्यादी अनंत मिसाळ व आरोपी सुनील मिसाळ यांच्यात दापोली चंद्रनगर येथे सामायिक जमीन असून त्याचे अद्याप वाटप झालेले नाही. 12 जुलै 2009 रोजी फिर्यादी अनंत मिसाळ यांच्या नावे मौजे चंद्रनगर येथील वरकस जमीन मिळकत सर्वे नं.116 भू. उप. क्र. 37 या मिळकतीमध्ये सुनिल मिसाळ यांनी मधूकर आईनकर यांच्याशी संगनमत करून ती विकण्याचा कट करून मनाली कानिटकर व इतर सहभागी सर्वांनी संगनमताने खोटे व बनावट खरेदीखत व मुखत्यारपत्र बनवले त्याचा खरेदीखत क्र. 1984/2009 तयार केले. यासाठी सुनील मिसाळ याने खोटे मुखत्यार पत्र दिले. त्यावर फिर्यादींच्या जागी आरोपी मधुकर आईनकर यांचा फोटो लावण्यात आलेला आहे. विजय गोरीवले, महेश भागवत व सचिन डोंगरकर यांनी या मुखत्यारपत्रावर ओळख-साक्षीदार म्हणून सही केली. या बाबतही न्यायालयात 15 डिसेंबर 2020 रोजी न्यालायात दावा दाखल करण्यात आला आहे. या दाव्यांमध्ये कोर्टाने सीआरपीसी 156 (3) प्रमाणे तपास करण्याचा व अहवाल दाखल करण्याचा आदेश केले आहे. त्यामुळे आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल अजित गुजर करीत आहेत.