पंप मालकाच्या प्रसंगावधानामुळे मोठा अनर्थ टळला!
प्रतिनिधी/ दापोली
शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या जी. बी. मेहता पेट्रोल पंपावर रविवारी रात्री 9.30 च्या सुमारास डिझेल भरण्यासाठी आलेल्या एका खासगी बसला डिझेल भरत असताना आग लागली. यावेळी मोठा स्फोट झाल्याने एकच गोंधळ उडाला. मात्र पेट्रोल पंप मालक आशिष मेहता यांनी दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे मोठा अनर्थ टळला.
रविवारी रात्री 9.30 या सुमारास मेहता पेट्रोल पंपात 3 खासगी बसेस डिझेल भरण्यासाठी आलेल्या होत्या. यावेळी सर्व गाडय़ांमध्ये प्रवासीदेखील बसलेले होते. दोन बसेस डिझेल भरून मुंबईकडे मार्गस्थदेखील झाल्या. मात्र तिसऱया देवरूख येथील प्रतीक इंदुलकर यांच्या मालकीच्या अंबाभवानी बसमध्ये पंपातील कर्मचारी राजेंद्र भुवड हे डिझेल भरत असताना अचानक मोठा स्फोट झाला. या स्फोटात राजेंद्र भुवड हे जबर भाजले. तसेच गाडीनेदेखील तत्काळ पेट घेतला. गाडी पेटल्याचे पाहून गाडीच्या चालकाने तत्काळ गाडी तिथेच टाकून पळ काढला. तसेच प्रवाशांनीदेखील गाडीच्या बाहेर पडून पेट्रोल पंपाच्या बाहेर धाव घेतली. या गाडीत 7 प्रवासी होते.
पेट्रोल पंपाचे मालक आशिष मेहता हे पंपाच्या केबिनमध्ये होते. त्यांनी स्फोटाचा आवाज ऐकला व तत्काळ बसच्या दिशेने धाव घेतली. बस पेटते आहे व चालक गाडीत नसल्याचे पाहून त्यांनी तत्काळ बसच्या केबिनमध्ये चढून बसचा ताबा घेतला व बस सुरू करून ती पंपाच्या बाहेर नेण्याचा प्रयत्न केला. मात्र पेट्रोल पंपाच्या दारातच बस लॉक झाली व बंद पडली. तोपर्यंत बसने मोठय़ाप्रमाणात पेट घेतला होता व धुराचे साम्राज्य पसरले होते.
याचवेळी पंपामध्ये आणखीन एक डिझेलचा टँकर भरलेल्या स्थितीत उभा होता, तर पंपाच्या बाहेर गॅस सिलेंडरने भरलेला ट्रक उभा होता. यावेळी पंपातील अन्य कर्मचाऱयांनी पंपामध्ये असणाऱया 11 अग्निग्नशमन उपकरणांनी आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. तसेच पेट्रोल पंपाच्या बाजूला राहणाऱया श्रीराम शिक्षण संस्थेचे सुजय मेहता व रितू मेहता यांनी आपल्या शिक्षण संस्थेसाठी विकत आणलेला सुरक्षा बॉलदेखील तत्काळ तिथे आणला व जळत्या बसखाली फोडला. यामुळे आग थोडी नियंत्रणात आली.
यानंतर दापोली नगरपंचायतीच्या अग्निशमन बंबाने या आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश मिळवले. मात्र तोपर्यंत बसचा बराचसा भाग जळून खाक झाला होता. आग आटोक्यात आणण्यात दापोली नगरपंचायतीचे मोहन गवळी, नितीन इंदुलकर, प्रशांत विचारे, प्रदीप गावडे, स्वप्नील महाकाळ, दीपक सावंत, अरुण मोहिते, राहुल शेवडे, रोहित शिंदे, स्वप्नील महाकाळ, अमित रेमजे, प्रशासकीय अधिकारी प्रवीण खरात आदींनी प्रयत्न केले.
आग लागलेली बस लॉक झालेली असल्याने ती पंपाच्या बाहेर काढणे कठीण झाले होते. यासाठी एक डंपर व एक जेसीबी मागवण्यात आला. यावेळी तेथे उपस्थित असणारा अन्य गाडीचा चालक जितू शिरवणेकर याने नगरसेवक मंगेश राजपूरकर यांच्या मदतीने बसच्या खाली जाऊन गाडीला लागलेले लॉक रिलीज केले. यामुळे गाडी बाहेर काढण्यात यश आले. गाडीला आग लागल्यानंतर दापोली नगरपंचायतीचा अग्निग्नशमन बंब आल्यावर तेथे बघ्यांची मोठय़ाप्रमाणात गर्दी झाली होती. यामुळे आग आटोक्यात आणण्यात अडथळे येत होते.
इतिहासाची पुनरावृत्ती
1988 साली मेहता पेट्रोल पंपाच्या मालकीच्या टँकरने असाच पेट घेतला होता. हा टँकर पंपाच्या टाकीत रिकामा होत असताना त्याच्या मागील पाईपने मोठा आवाज करून पेट घेतला होता. यावेळी तेथे उपस्थित भाऊ मेहता यांनी तातडीने टँकरचा ताबा घेऊन टँकर पंपाच्या बाहेर काढून सध्याच्या कामतेकर यांच्या झुणका-भाकर केंद्रासमोर उभा केला होता. यामुळे मोठा अनर्थ टळला होता. त्यावेळी दापोलीमध्ये ग्रामपंचायत अस्तित्वात असल्याने ग्रामपंचायतीच्या मालकीचा अग्निग्नशमन बंब नव्हता. यामुळे तालुक्याच्या बाहेरून आग आटोक्यात आणण्यासाठी आलेल्या बंबाला उशीर केल्याने संपूर्ण टॅंकर जळून गेला होता. रविवारच्या घटनेने या आठवणी जाग्या झाल्या.