प्रतिनिधी/ महाबळेश्वर
मुंबईवरून आलेल्या त्या 22 लोकांच्या ग्रुपमधील दाभे येथील एका महीलेला कोरोनाची बाधा झाल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे महाबळेश्वर तालुक्यातील कोरोना रूग्णांची संख्या आता 27 झाली आहे. ही महीला महाबळेश्वर येथील कोरोना केअर सेंटरमध्ये रहात होती, तिचा पती आणि मुलगी यांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत.
मुंबई येथून गावाकडे येणारांची संख्या वाढल्याने जिल्हा प्रशासनाने जिल्हा सिमा सिल केल्या आणि ग्राम समित्यांनी अशा लोकांना वेगळया जागी क्वॉरंटाईन करण्यास सुरूवात केली. अशाच क्वॉरंटाईन केलेल्या लोकांना हळुहळु कोरोनाची बाधा झाल्याचे निष्पन्न झाले. सुदैवाने ही सर्व मंडळी क्वॉरंटाईनमध्ये असल्याने कोरोनाचा फैलाव मोठय़ा प्रमाणावर झाला नाही. त्यामुळे महाबळेश्वर येथे कोरोनाची साखळी खंडीत झाल्याचे वाटत असतानाच चार दिवसानंतर आता पुन्हा मुंबई येथून आलेल्या दाभे गावातील एका महीलेचा अहवाल पॉझिटिव्ह आला आणि महाबळेश्वरकरांच्या चिंतेत भर पडली. या महीलेमुळे तालुक्यातील कोरोना रूग्णांची संख्या 27 झाली आहे. यापैकी 9 लोक कोरोना मुक्त झाले असून एका रूग्णाचे निधन झाले आहे. तर महाबळेश्वर तालुक्यातील 17 रूग्णांवर पाचगणी येथील कोविड रूग्णालयात उपचार सुरू आहेत. तसेच सेंटरमध्ये जावली व खंडाळा येथीलही काही रूग्ण उपचार सुरू असून एकून 45 कोरोनाचे रूग्ण असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
काल महाबळेश्वर येथील काही संशयितांचे स्वॅबचे नमुने घेण्यात आले होते. या सर्वांचे अहवाल मंगळवारी रात्री उसीरा आले. दरम्यान गेली सात दिवस अहोरात्र कोरोना रूग्णांची सेवा करणारे तीन डॉक्टरांच्या पथकाला सुट्टी देण्यात आली असून या सर्वांना सात दिवसांच्या विश्रांतीसाठी पर्यटन विकास महामंडळाच्या व्हीआयपी कक्षात ठेवण्यात आले आहे. सात दिवसांनी पुन्हा त्यांना होम क्वॉरंटाईन करण्यात येणार आहे.