विश्व चषक तिरंदाजी स्टेज 1- भारताला पाच पदके मिळविण्याची संधी
वृत्तसंस्था/ ग्वाटेमाला सिटी
भारताचे अव्वल तिरंदाज दाम्पत्य अतानू दास व दीपिका कुमारी यांनी वेगवान वाऱयाच्या अडथळय़ावर मात करीत येथे सुरू असलेल्या विश्व चषक स्टेज 1 स्पर्धेच्या वैयक्तिक रिकर्व्ह विभागात उपांत्य फेरी गाठली तर मिश्रमध्ये कांस्यपदकाच्या फेरीत स्थान मिळविले.
सुमारे दोन वर्षाच्या खंडानंतर विश्व चषक स्पर्धेत खेळणाऱया दास व दीपिका यांनी मिश्र रिकर्व्ह विभागात कांस्यपदकाच्या प्लेऑफमध्ये स्थान मिळविल्याने भारताला एकूण पाच पदके मिळण्याची संधी मिळाली आहे. या स्पर्धेवेळी वेगवान वारे वाहत होते. त्यामुळे तिरंदाजी करणे जड जात होते. तरीही दीपिकाने वैयक्तिक विभागात अप्रतिम प्रदर्शन करीत जर्मनीच्या मिशेली क्रॉपेनचा पराभव केला. तिने 29, 30, 30 असे गुण नोंदवले. उर्वरित सर्व तिरंदाजांना मात्र वाऱयामुळे संघर्षच करावा लागला. जागतिक क्रमवारीत सध्या नवव्या स्थानावर असणाऱया दीपिकाची उपांत्य लढत मेक्सिकोच्या अलेजांद्रा व्हॅलेन्सियाशी रविवारी होणार आहे. दीपिका ही ऑलिम्पिकसाठी पात्र ठरलेली भारताची एकमेव तिरंदाज आहे. तिने आतापर्यंत विश्व चषक स्पर्धेचे अंटाल्या, तुर्की (2012) व सॉल्ट लेक सिटी, अमेरिका (2018) येथील दोन टप्पे जिंकले होते. याशिवाय वर्ल्ड कप फायनल्समध्ये तिने तीनदा पदके मिळविली आहेत. दीपिकाने त्याआधी दुसऱया फेरीत अमेरिकेच्या केल्सी लार्डचा 6-0, त्यानंतर मेक्सिकोच्या आयदा रोमनचा शूटऑफमध्ये 6-5 (10-9) असा पराभव केला होता.
दरम्यान, पुरुष विभागात अतानू दास उपांत्यपूर्व फेरीत सुदैवी ठरला. त्याचा कॅनडाचा प्रतिस्पर्धी एरिक पीटर्सला शेवटच्या सेटमध्ये अचूक वेध घेता न आल्याने दासला 6-4 असा विजय मिळाला. त्याला या स्पर्धेत अजून एकदाही पदक मिळविता आलेले नाही. 2016 मध्ये अंटाल्या येथे झालेल्या स्पर्धेत त्याने चौथे स्थान मिळवित वैयक्तिक सर्वोत्तम कामगिरी नोंदवली होती. रविवारी त्याची उपांत्य लढत अल्वार्डोशी होणार आहे. दासने त्याआधी एल साल्वादोरच्या ऑस्कर टिकासचा 6-4 असा पराभव केल्यानंतर आपलाच संघसहकारी प्रवीण जाधवला याच गुणफरकाने हरवून उपांत्य फेरी गाठली होती.
मिश्र रिकर्व्हमध्ये दास-दीपिका यांना दुसरे मानांकन असून त्यांनी स्पेनच्या जोडीचा पराभव करून उपांत्य फेरी गाठली होती. पण उपांत्य फेरीत त्यांना शूटऑफमध्ये मेक्सिकोच्या जोडीकडून 4-4 अशा बरोबरीनंतर पराभव स्वीकारावा लागला. त्यामुळे रविवारी होणाऱया कांस्यपदकाच्या प्लेऑफमध्ये त्यांची लढत अग्रमानांकित अमेरिकेच्या ब्रॅडी एलिसन व कॅसी कॉफहोल्ड यांच्याशी होणार आहे. महिलांच्या रिकर्व्ह उपांत्यपूर्व फेरीत भारताच्या अंकिता भगतला अलेजांदाकडून 2-6 असा पराभव स्वीकारावा लागला. याशिवाय पुरुष व महिलांच्या सांघिक विभागातही उपांत्यपूर्व फेरी गाठल्याने भारताला पदकाची संधी आहे. जुलै 2019 मध्ये बर्लिन येथे झालेल्या विश्व चषक स्टेज 4 मध्ये भारताने भाग घेतला होता. त्यानंतर वर्ल्ड कपमध्ये ते पहिल्यांदाच खेळत आहेत.