आमदार सुदिन ढवळीकर यांचे आवाहन
वार्ताहर/ मडकई
दिवाळीचा सण साजरा करताना नरकासुराला जास्त महत्त्व देण्यापेक्षा जगण्याचा मंत्र देणाऱया भगवान श्रीकृष्णाचे पुजन करा. मानवतेचे शिक्षण व धर्म संस्कृतीच्या कार्याची परंपरा समृद्ध करण्यासाठी युवकांनी संघटीत होणे गरजे आहे. बांदोडय़ातील भाऊसाहेब बांदोडकर मैदानावर साजऱया होणाऱया ‘दीपोत्सव 2021’ कार्यक्रमात सहभागी होऊन पारंपरिक सण-उत्सवाची परंपरा शिकून घेण्याचे आवाहन मगो पक्षाचे नेते आमदार सुदिन ढवळीकर यांनी केले.
महालक्ष्मीनगर तळावली येथे सरक्षंक भिंत व साकव दुरूस्ती कार्यक्रमप्रसंगी ते बोलत होते. कोरोनामुळे या कामाला विलंब झाला. यावर्षी झालेल्या जोरदार पावसामुळे काही घरात पाणी शिरले. अत्यंत धोकादायक स्थितीत असलेल्या या येथील घरांच्या सुरक्षेसाठी ही संरक्षक भिंत व साकव बांधण्याची आवश्यकता होती, असे ढवळीकर यांनी सांगितले.
यावेळी कवळे जिल्हा पंचायत सदस्य गणपत नाईक, तळावली पंचायतीचे सरपंच दिलेश गांवकर, उपसरपंच सोनीया नाईक, पंचसदस्य सुनिल नाईक, भारती नाईक, महादेव नाईक, हर्षल तळावलीकर, बांधकाम खात्याचे सहाय्यक अभियंते अरविंद फडते, कनिष्ठ अभियंत्या दिक्षा, कंत्राटदार विशाल दुर्भाटकर, जयकांत तारी, बांदोडाचे पंचसदस्य वामन नाईक, माजी पंचसदस्य सुर्यकांत भिंगी आदी उपस्थीत होते.
भाजपा पुन्हा सत्तेवर आल्यास राज्याचे भवितव्य अंधारात
मगो पक्षाचे पहिले मुख्यमंत्री स्व. भाऊसाहेब बांदोडकर यांनी राज्यात शिक्षणाचा पाया घातल्याने गोवा सुशिक्षित व सुसंस्कृत बनला. मात्र आजच्या राज्यकर्त्यांनी शिक्षण क्षेत्रात जो घोळ घातलेला आहे, त्यामुळे युवा पिढीचे भवितव्य अंधारमय बनले आहे. येणाऱया निवडणुकीत भाजपाच्या हाती सत्ता दिल्यास गोव्याचे भवितव्य अंधारमय होईल. गोव्याच्या भवितव्याची काळजी असलेल्या जाणकारांना सोबत घेऊन मगो पक्ष शिक्षण व अन्य क्षेत्रात सकारात्मक बदल घडविण्या सज्ज आहे, असे ढवळीकर म्हणाले.
सरपंच दिलेश गावंकर म्हणाले, आमदार सुदिन ढवळीकर यांचे विकासासंबंधीची तळमळ व कौशल्य वाखाणण्याजोगे आहे. गोव्यातील जनतेच्या प्रश्नांना मगो पक्षच न्याय देऊ शकेल. मगो पक्षाच्या नेत्रृत्त्वाबरोबरच राज्याचे नेत्रृत्त्व करण्यास ते सक्षम आहेत. त्यासाठी गोव्यात मगोचे सरकार सत्तेवर येणे गरजेचे आहे.
आमदार सुदिन ढवळीकर यांचा राजकारणातील प्रदीर्घ अनुभव पाहिल्यास ते मुख्यमंत्री बनसण्यास योग्य आहेत. प्रशासकीय अनुभव व जनसामान्यांशी असलेला त्यांचा व्यापक संपर्क लक्षात घेऊन जनतेने त्यांच्या पाठिशी राहण्याची गरज हर्षल तळावलीकर यांनी व्यक्त केली.
श्रीफळ वाढवून आमदार ढवळीकर यांच्याहस्ते संरक्षक भिंत व साकवाच्या दुरुस्तीकामाला प्रारंभ केला. स्वागत विशाल दुर्भाटकर यांनी केले.