ऑनलाईन टीम / धारावी :
महाराष्ट्रात कोरोना रूग्णांच्या संख्येत लक्षणीय घट होताना दिसत आहे. त्यातच कोरोनाच्या पहिल्या लाटेत हॉट स्पॉट असलेला धारावी परिसरातून दिलासादायक बाब समोर आली आहे. दुसऱ्या लाटेत हा परिसर कोरोनामुक्त होण्याकडे वाटचाल करताना पाहायला मिळत आहे. कारण धारावी परिसरात मागील 24 तासात एकही नवीन रुग्ण आढळून आला नाही आहे.
दरम्यान, कोरोना काळात धडकी भरेल अशीच कोरोना रुग्णसंख्या धारावीमध्ये पाहायला मिळाली होती. पण, पालिका कर्मचारी, आरोग्य यंत्रणा, स्वयंसेवी संस्था अशा कोविड योद्ध्यांच्या योगदानाने आणि अर्थातच नागरिकांच्या सहकार्याने कोरोनाशी लढा दिला आणि खऱ्या अर्थाने बऱ्याच अंशी हा लढा यशस्वीही ठरला आहे.
सोमवारी (14 जून) आलेल्या नव्या आकडेवारीनुसार मागील 24 तासांत आशिया खंडातील सर्वात मोठी झोपडपट्टी असणाऱ्या या परिसरात एकही कोरोना रुग्ण आढळला नाही ही एक मोठी दिलासादायक बातमीच आहे. तब्बल चार महिन्यानंतर पहिल्यांदा धारावीत कोरोनाचा एकही रुग्ण आढळलेला नाही.
दरम्यान, कोरोनाच्या पहिल्या लाटेत 25 डिसेंबर, 22 जानेवारी, 26 जानेवारी, 27 जानेवारी, 31 जानेवारी आणि 2 फेब्रुवारी रोजी एकही रुग्ण आढळला नव्हता.