ऑनलाईन टीम / मुंबई :
कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका समोर असतानाच महाराष्ट्रातून एक दिलासादायक बाब समोर आली आहे. सोमवारी कोरोनाच्या दैनंदिन रुग्ण संख्येपेक्षा बऱ्या होणाऱ्या रुग्णांची संख्या दुप्पट आहे. यासोबतच दैनंदिन मृत्यू संख्येत देखील घट झाली आहे. मागील 24 तासात राज्यात 3 हजार 643 नवीन कोरोनाबाधित आढळले असून 6 हजार 795 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर कालच्या दिवशी 105 रूग्णांचा मृत्यू झाला आहे.
- रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 97.05 %
राज्यात आजपर्यंत एकूण 62 लाख 38 हजार 794 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 97.05 टक्के इतके झाले आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर 2.11 टक्के एवढा आहे.
- सक्रिय रुग्ण संख्येत घट
दरम्यान, आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 5,24,45,689 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 64,28,294 नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 3,02,888 व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर 2,487 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात सद्य स्थितीत 49 हजार 924 ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.