बांगलादेशचे माहिती मंत्री सामील
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
राष्ट्रीय राजधानी नवी दिल्ली येथे रायसीना डायलॉग 2020 ला मंगळवारी प्रारंभ झाला आहे. जागतिक राजकारण आणि अर्थव्यवस्थेवर आधारित या परिषदेत 100 अधिक देशांचे सुमारे 700 प्रतिनिधी सहभागी झाले आहेत. 14-16 जानेवारीपर्यंत चालणाऱया या परिषदेला पंतप्रधान नरेंद्र मोदीही संबोधित करणार आहेत. या चर्चासत्रात बांगलादेशचे माहिती मंत्रीही सामील झाले आहेत. बांगलादेशने यापूर्वी स्वतःच्या 4 मंत्र्यांचा दौरा रद्द केला असल्याने त्यांचा सहभाग महत्त्वाचा ठरला आहे.
या परिषदेत रशिया, इराण, डेन्मार्क, हंगेरी, मालदीव, दक्षिण आफ्रिका, इस्टोनिया आणि युरोपीय महासंघासह 10 देशांचे विदेशमंत्री सामील होत आहेत. बांगलादेशने माहिती मंत्री मोहम्मद एच. महमूद यांना पाठविले आहे. बांगलादेशचे अधिकृत ब्रॉडकास्टर बांगलादेश बेतार आणि भारताच्या ऑल इंडिया रेडिओदरम्यान सहकार्यासंबंधी मंगळवारी करार झाला आहे. भारताच्या वतीने केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर आणि बांगलादेशच्या वतीने महमूद यांनी या करारसंबंधी कार्यक्रमात भाग घेतला आहे.
इराणचे विदेशमंत्री दाखल
इराणचे विदेशमंत्री जवाद जरीफ यांनी या परिषदेत भाग घेतला आहे. इराणच्या कुद्स फोर्सचे कमांडर कासिम सुलेमानी मारले गेल्याच्या पार्श्वभूमीवर जरिफ यांचा भारत दौरा अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे. जरीफ हे पंतप्रधान नरेंद्र मोदींची बुधवारी भेट घेणार आहेत. तर विदेशमंत्री एस. जयशंकर आणि जरीफ यांच्यात गुरुवारी चर्चा होणार आहे.
महत्त्वाची परिषद
रायसीना डायलॉगच्या पाचव्या टप्प्यात विदेशमंत्री एस. जयशंकर हे 12 देशांसोबत द्विपक्षीय चर्चा करणार आहेत. या परिषदेत यंदा 100 देशांचे 700 प्रतिनिधी सामील होत आहेत. रायसीना डायलॉगच्या माध्यमातून आशियाचे एकीकरण आणि जागतिक स्तरावर संधींचा शोध घेण्याचा प्रयत्न आहे. रायसीना डायलॉगमध्ये जागतिक समुदायासमोरील आव्हानात्मक मुद्दे मांडले जातात.
यंदाचे विषय
यंदाच्या रायसीना डायलॉगमध्ये जागतिक आव्हाने, अजेंडा 2030, आधुनिक जगतात तंत्रज्ञानाची भूमिका, हवामान बदल आणि दहशतवादविरोधी मोहिमांसारख्या महत्त्वपूर्ण विषयांवर वक्ते भूमिका मांडणार आहेत. या परिषदेत आफ्रिकेतील 80 प्रतिनिधी सहभागी होत असून यातील 40 टक्के महिलांची हिस्सेदारी आहे. परिषदेत 7 देशांचे माजी अध्यक्ष आणि 12 देशांचे विदेशमंत्री सामील होणार आहेत. शांघाय सहकार्य परिषद आणि राष्ट्रकुलचे महासचिव देखील या परिषदेत सहभागी होणार आहेत. तसेच जगभरातील 30 थिंक टँकांचे नेते परिषदेला हजेरी लावणार आहेत.