केजरीवाल सरकारने व्हॅट कमी करण्याचा घेतला निर्णय
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
दिल्ली सरकारने डिसेंबर महिन्याच्या पहिल्याच दिवशी सर्वसामान्यांना स्वस्त पेट्रोलची भेट दिली आहे. राज्य सरकारने पेट्रोलवरील व्हॅट 30 टक्क्यांवरून कमी करत 19.40 टक्के केला आहे. यामुळे दिल्लीत पेट्रोल 8 रुपये प्रतिलिटरपर्यंत स्वस्त होणार आहे. पण डिझेलवर आकारण्यात येणाऱया व्हॅटमध्ये कुठलीच कपात करण्यात आलेली नाही. नवे दर लागू झाले आहेत.
पेट्रोल-डिझेल जीएसटीच्या कक्षेत येत नसल्याने केंद्र सरकारकडून उत्पादन शुल्क आणि राज्य सरकारकडून व्हॅट आकारण्यात येतो. केंद्र सरकारने यापूर्वीच उत्पादन शुल्कात मोठी कपात केल्याने पेट्रोल-डिझेलचे दर कमी झाले आहेत. त्यानंतर भाजपशासित राज्यांकडून व्हॅट कमी करण्यात आला होता. यामुळे बिगर भाजपशासित राज्यांमधील सरकारांवर व्हॅट कमी करण्याचा दबाव निर्माण झाला आहे.
महाराष्ट्रात सर्वात महाग पेट्रोल
सद्यकाळात सर्वात महाग पेट्रोल महाराष्ट्रातील परभणी येथे विकण्यात येत आहे. तेथे पेट्रोलचा दर 113.17 रुपये प्रतिलिटर इतका आहे. तर राजस्थानच्या श्रीगंगानगरमध्ये पेट्रोल 112.11 रुपये प्रतिलिटर दराने विकण्यात येत आहे.
केंद्राकडून पूर्वीच दिलासा
पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किमतीपासून लोकांना दिलासा देण्यासाठी केंद्र सरकारने 3 नोव्हेंबर रोजी पेट्रोलवरील 5 रुपये तर डिझेलवरील उत्पादन शुल्कात 10 रुपयांची कपात केली होती. त्यानंतर कर्नाटक, पुड्डुचेरी, मिझोरम, अरुणाचल प्रदेश, मणिपूर, नागालँड, त्रिपुरा, आसाम, सिक्कीम, बिहार, मध्यप्रदेश, गोवा, गुजरात, दादरा आणि नागर हवेली, दमण आणि दीव, चंदीगड, हरियाणा, हिमाचल प्रदेश, जम्मू-काश्मीर, उत्तराखंड, उत्तरप्रदेश आणि लडाखकडून व्हॅटमध्ये कपात करण्यात आली आहे. यामुळे सर्वसामान्यांना काहीसा दिलासा मिळाला आहे.