परंतु राजकीय इच्छाशक्तीचा अभाव : संघ-संस्थांकडून विमानसेवेच्या मागणीला जोर
प्रतिनिधी / बेळगाव
देशाची राजधानी असलेल्या दिल्ली शहराला बेळगावमधून विमानसेवा सुरू करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. बेळगावमधील व्यापारी, उद्योजक तसेच इतर संघटनांच्या पदाधिकाऱयांनी दिल्ली विमानसेवा सुरू करण्यासाठी मोहीम उघडली आहे. याला काही प्रमाणात राजकीय इच्छाशक्तीची जोड मिळाल्यास दिल्ली शहराला लवकर विमानसेवा सुरू होण्याची शक्यता आहे.
बेळगावमध्ये मराठा लाईट इन्फंट्रीसोबतच एअरफोर्सचा मुख्य तळ असल्याने येथून जम्मू-काश्मीर, अमृतसर, उत्तरप्रदेश परिसरात जाणाऱया जवानांची संख्या अधिक आहे. सध्या सर्रास जवान विमानाने प्रवास करीत आहेत. बेळगावमधून थेट दिल्लीला विमानसेवा उपलब्ध नसल्याने त्यांना हैद्राबाद येथून कनेक्टिंग फ्लाईटचा पर्याय निवडावा लागत आहे. बेळगावमधून सर्वाधिक प्रवासी हैद्राबादाला प्रवास करीत आहेत. त्यामुळे दिल्ली शहराला विमानसेवेची मागणी वाढली आहे.
घोडावत ग्रुपची होती सहमती
स्टार एअरचे एम.डी. श्रेणिक घोडावत यांनी जानेवारीत बेळगावला भेट दिली होती. पत्रकारांच्या प्रश्नावर ते म्हणाले होते, हुबळीतून दिल्लीला स्टार एअरने विमानसेवा सुरू केली आहे. बेळगावमधून प्रवाशांनी मागणी केल्यास आम्ही लवकरच बेळगाव-दिल्ली विमानसेवा सुरू करू, असे सांगितले होते. हुबळी येथून प्रतिसाद चांगला असल्याने बेळगावमधून दिल्लीला विमानसेवा सुरू झाल्यास उत्तम प्रतिसाद मिळण्याची शक्मयता आहे.
राजकीय इच्छाशक्तीचा अभाव
बेळगाव जिल्हय़ात सध्या एक लोकसभा खासदार व एक राज्यसभा खासदार आहेत. केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री सुरेश अंगडी बेळगावचा कोणताही प्रश्न तातडीने लोकसभेत उपस्थित करून त्याचा पाठपुरावा करत होते. उडान-3 मधून बेळगावला सर्वाधिक मार्ग मिळाले. त्यामध्येही अंगडी यांचे योगदान महत्त्वाचे होते. परंतु सध्या दिल्ली विमानसेवा सुरू करण्याबाबत मागणी होत असतानाही राजकीय इच्छाशक्ती कमी पडत असल्याचे दिसून येत आहे. खासदारांना अधिवेशनासाठी दिल्लीला जाताना इतर शहरांमधून जावे लागत असल्याने निदान याचा तरी विचार करून दिल्लीला विमानसेवा सुरू करण्याची मागणी होत आहे.
बेळगाव विमानतळावर सेवा उपलब्ध
बेळगाव विमानतळावर नाईट लँडिंग, उत्तम दर्जाचा रन-वे, इतर सेवा उपलब्ध आहेत. त्यामुळे दिल्ली शहराला विमानसेवा सुरू झाल्यास त्याला लागणाऱया सर्व सेवा उपलब्ध आहेत. सध्या हैद्राबादला सर्वाधिक प्रवासी प्रवास करत असून यातील अधिकजण हैद्राबादमार्गे दिल्लीला जात आहेत. त्यात लष्करी जवानांची संख्या अधिक असल्याचे बेळगाव विमानतळ प्राधिकरणचे संचालक राजेशकुमार मौर्य यांनी सांगितले.