दमदार विजयासह गुणतालिकेत अव्वलस्थानी झेप, स्टोईनिसचे अर्धशतक
वृत्तसंस्था/ दुबई
मार्कस स्टोईनिस (26 चेंडूत नाबाद 53), पृथ्वी शॉ (23 चेंडूत 42) व ऋषभ पंत (37) यांची जोरदार फटकेबाजी व रबाडासह (4-24) अन्य गोलंदाजांच्या भेदक माऱयामुळे दिल्ली कॅपिटल्स संघाने आयपीएल साखळी सामन्यात विराट कोहलीच्या आरसीबीला पराभवाचा जबरदस्त झटका दिला. दिल्लीने प्रथम फलंदाजीचे निमंत्रण मिळाल्यानंतर 4 बाद 196 धावांचा डोंगर रचला तर प्रत्युत्तरात आरसीबीला 9 बाद 137 धावांसह विजयापासून कित्येक कोस दूर रहावे लागले.
विजयासाठी 197 धावांचे आव्हान असताना देवदत्त पडिक्कल (4), ऍरॉन फिंच (13), डीव्हिलियर्स (9), मोईन अली (9) स्वस्तात बाद झाले आणि त्यानंतर विराट कोहलीही बाद झाल्यानंतर आरसीबीच्या आशाअपेक्षा संपुष्टात आल्या. विराटने 39 चेंडूत 43 धावांचे योगदान दिले.
आरसीबीचा निम्मा संघ अवघ्या 94 धावात गुंडाळला गेल्यानंतर उर्वरित फलंदाजांनी देखील हाराकिरीचा कित्ता गिरवला आणि अंतिमतः दिल्लीच्या धमाकेदार विजयावर शिक्कामोर्तब झाले. दिल्लीतर्फे जलद गोलंदाज कॅगिसो रबाडाने 24 धावात 4 तर नोर्त्जे, अक्षर पटेल यांनी प्रत्येकी 2 बळी घेतले.
स्टोईनिसची फटकेबाजी
तत्पूर्वी, पाचव्या स्थानावरील मार्कस स्टोईनिसचे (26 चेंडूत नाबाद 53) तडफदार अर्धशतक व पृथ्वी शॉ (42), ऋषभ पंत (37) यांच्या फटकेबाजीमुळे दिल्ली कॅपिटल्स संघाने निर्धारित 20 षटकात 4 गडय़ांच्या बदल्यात 196 धावांपर्यंत मजल मारली.
आरसीबीने नाणेफक जिंकून दिल्लीला प्रथम फलंदाजीला पाचारण केले. त्यानंतर पृथ्वी शॉ व शिखर धवन या जोडीने 6.4 षटकात 68 धावांची सलामी दिली. शॉने 23 चेंडूत 5 चौकार, 2 षटकारांसह 42 तर शिखर धवनने 28 चेंडूत 32 धावांचे योगदान दिले. धवनच्या खेळीत 3 चौकारांचा समावेश राहिला.
डावातील सातव्या षटकात मोहम्मद सिराजच्या उसळत्या चेंडूवर शॉ यष्टीमागे झेल देत बाद झाला. वास्तविक, शॉ आक्रमक फटका खेळण्याच्या पवित्र्यात होता. पण, अंतिम क्षणी त्याचा अंदाज चुकला आणि चेंडू ग्लोव्हजला स्पर्शून यष्टीरक्षक डीव्हिलियर्सच्या हातात विसावला.
शॉ बाद झाल्यानंतर काही वेळेतच सहकारी सलामीवीर शिखर धवनने देखील तंबूचा रस्ता धरला. त्याला उदाणाने डावातील 10 व्या षटकात लाँगऑनवरील अलीकरवी झेलबाद केले. धवनचा येथे षटकार खेचण्याचा प्रयत्न होता.
कर्णधार श्रेयस अय्यरला या लढतीत फार काळ तग धरता आले नाही. डीप मिडविकेटवरील पडिक्कलने नाटय़मय झेल पूर्ण केल्यानंतर अय्यरची खेळी संपुष्टात आली. त्याला 13 चेंडूत 11 धावा जमवता आल्या. अय्यरने येथे जोरदार फटका लगावला होता. पण, उंचापुऱया पडिक्कलने झेल पूर्ण केल्यानंतर सीमारेषेपार जावे लागेल, हे ध्यानात येताच चेंडू हवेत फेकला आणि नंतर स्वतःला सावरत आत येऊन अप्रतिम झेल पूर्ण केला. दिल्लीची यावेळी 11.3 षटकात 3 बाद 90 अशी स्थिती होती.
राष्ट्रीय संघात यष्टीरक्षकाच्या जबाबदारीसाठी सातत्याने चर्चेत असलेल्या ऋषभ पंतने येथे उत्तम सुरुवात केल्यानंतरही हाराकिरी करत अक्षरशः आपली विकेट फेकली. त्याने 25 चेंडूत 3 चौकार, 2 षटकारांसह 37 धावा जमवल्या. सिराजच्या स्लोअर वनवर पंतने चेंडू यष्टीवर ओढवून घेतला.
एकीकडे, अन्य फलंदाज ठरावीक अंतराने बाद होत असताना 5 व्या स्थानी फलंदाजीला उतरलेल्या स्टोईनिसने मात्र चौफेर फटकेबाजीचे दर्शन घडवत 26 चेंडूत नाबाद 53 धावांची आतषबाजी केली. त्याच्या अर्धशतकी खेळीत 6 चौकार व 2 षटकारांचा समावेश राहिला. या खेळीदरम्यान स्टोईनिसचा स्ट्राईक रेट 203.84 इतका तुफानी राहिला. हेतमेयर 7 चेंडूत एका षटकारासह 11 धावांवर नाबाद राहिला.
गोलंदाजीत मोहम्मद सिराजने 4 षटकात 34 धावात 2 तर मोईन अली, उदाना यांनी प्रत्येकी 1 बळी घेतला.
धावफलक
दिल्ली कॅपिटल्स : पृथ्वी शॉ झे. डीव्हिलियर्स, गो. सिराज 42 (23 चेंडूत 5 चौकार, 2 षटकार), शिखर धवन झे. अली, गो. उदाणा 32 (28 चेंडूत 3 चौकार), श्रेयस अय्यर झे. पडिक्कल, गो. अली 11 (13 चेंडूत 1 चौकार), ऋषभ पंत त्रि. गो. मोहम्मद सिराज 37 (25 चेंडूत 3 चौकार, 2 षटकार), स्टोईनिस नाबाद 53 (26 चेंडूत 6 चौकार, 2 षटकार), शिमरॉन हेतमेयर नाबाद 11 (7 चेंडूत 1 षटकार). अवांतर 10. एकूण 20 षटकात 4 बाद 196.
गडी बाद होण्याचा क्रम :
1-68 (शॉ, 6.4), 2-82 (धवन, 9.4), 3-90 (श्रेयस अय्यर, 11.3), 4-179 (ऋषभ पंत, 18.2).
गोलंदाजी :
उदाना 4-0-40-1, वॉशिंग्टन सुंदर 4-0-20-0, नवदीप सैनी 3-0-48-0, यजुवेंद्र चहल 3-0-29-0, मोहम्मद सिराज 4-0-34-2, मोईन अली 2-0-21-1.
आरसीबी : देवदत्त पडिक्कल झे. स्टोईनिस, गो. अश्विन 4 (6 चेंडू), ऍरॉन फिंच झे. पंत, गो. अक्षर पटेल 13 (14 चेंडूत 1 चौकार), विराट कोहली झे. पंत, गो. रबाडा 43 (39 चेंडूत 2 चौकार, 1 षटकार), एबी डीव्हिलियर्स झे. धवन, गो. नोर्त्जे 9 (6 चेंडूत 2 चौकार), मोईन अली झे. हेतमेयर, गो. अक्षर पटेल 11 (13 चेंडूत 1 चौकार), वॉशिंग्टन सुंदर झे. अश्विन, गो. रबाडा 17 (11 चेंडूत 3 षटकार), शिवम दुबे त्रि. गो. रबाडा 11 (12 चेंडूत 1 षटकार), उदाणा झे. अय्यर, गो. रबाडा 1 (3 चेंडू), नवदीप सैनी नाबाद 12 (12 चेंडूत 1 चौकार), मोहम्मद सिराज त्रि. गो. नोर्त्जे 5 (4 चेंडूत 1 चौकार), यजुवेंद चहल नाबाद 0 (0 चेंडू). अवांतर 11. एकूण 20 षटकात 9 बाद 137.
गडी बाद होण्याचा क्रम : 1-20 (देवदत्त पडिक्कल, 2.6), 2-27 (फिंच, 3.6), 3-43 (डीव्हिलियर्स, 5.5), 4-75 (मोईन अली, 11.6), 5-94 (विराट, 13.3), 6-115 (वॉशिंग्टन सुंदर, 15.6), 7-118 (दुबे, 17.1), 8-119 (उदाणा, 17.3), 9-127 (सिराज, 18.6).
गोलंदाजी : कॅगिसो रबाडा 4-0-24-4, नोर्त्जे 4-0-22-2, रविचंद्रन अश्विन 4-0-26-1, अक्षर पटेल 4-0-18-2, हर्षल पटेल 4-0-43-0.