उपराज्यपाल सक्सेनांनी दिली बैठकीला मंजुरी
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
दिल्लीत महापौरपदाच्या निवडणुकीसाठी नवी तारीख जाहीर करण्यात आली आहे. आता 16 फेब्रुवारी रोजी निवडणूक होणार असून याकरता उपराज्यपाल विनय कुमार सक्सेना यांनी मंजुरी दिली आहे. दिल्ली सरकारने उपराज्यपालांना 16 फेब्रुवारी रोजी सभागृहाची बैठक आयोजित करण्याचा प्रस्ताव पाठविला होता,ह हा प्रस्ताव उपराज्यपालांनी मान्य केला आहे. यापूर्वी सभागृहाची तीनवेळा बैठक झाली असली तरीही भाजप तसेच आप नेत्यांच्या गोंधळामुळे निवडणूक होऊ शकली नव्हती.
6 फेब्रुवारी रोजी दिल्लीत महापौरपदाची निवडणूक तिसऱयांदा टळली होती. 10 नामनिर्देशित सदस्यांना मतदानाची मंजुरी मिळाल्यावर भाजप आणि आप नगरसेवकांनी गोंधळ घालण्यास सुरुवात केली होती. यामुळे सभागृहाचे कामकाज स्थगित करावे लागले होते. आम आदमी पक्षाने महापौरपदासाठी शैली ओबेरॉय तर भाजपने रेखा गुप्ता यांना उमेदवारी दिली आहे. महापौर भाजपचाच होईल असा दावा भाजप खासदार हंसराज हंस यांनी केला आहे. उपमहापौरपदासाठी आपच्या वतीने मोहम्मद इक्बाल तर भाजपकडून कमल बागडी निवडणूक लढविणार आहेत.