राज्यात कोरोना पॉझिटिव्हिटी दर 1.26 टक्के
प्रतिनिधी /बेंगळूर
राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस कमी होत असून चार महिन्यांनंतर प्रथमच दिवसभरातील नव्या कोरोना रुग्णांच्या नोंदीचा आकडा 2 हजारांच्या खाली आला आहे. त्यामुळे राज्यातील जनतेला दिलासा मिळाला आहे. राज्यात सोमवारी 1,386 नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. दिवसभरात 1,09,399 कोविड चाचण्या करण्यात आल्या. त्या तुलनेत सोमवारी पॉझिटिव्हिटी दर केवळ 1.26 टक्के इतका होता.
महाराष्ट्र, केरळ राज्यांमध्ये कोरोनाचे नवे रुग्ण आढळण्याचे प्रमाण वाढत असताना कर्नाटकात रुग्णसंख्येत घट होत आहे. ही सकारात्मक बाब आहे. दरम्यान, मागील चोवीस तासांत 3,204 जण कोरोनामुक्त झाले. तर दिवसभरात 61 बाधितांच्या मृत्यूची नोंद झाला आहे.
आरोग्य खात्याच्या हेल्थ बुलेटिननुसार राज्यात आतापर्यंत 28,72,684 अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. त्यातील 28,01,907 जणांनी कोरोनावर मात केली आहे. तर एकूण 35,896 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर सक्रिय रुग्णसंख्या 34,858 इतकी आहे.
ब्लॅक फंगसमुळे बेंगळुरात 100 हून अधिक मृत्यू
कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत असतानाच बेंगळूरमध्ये ब्लॅक फंगसच्या रुग्णांची संख्या वाढतच आहे. बेंगळूर शहरात ब्लॅक फंगसमुळे आतापर्यंत 104 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर राज्यभरात 303 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. गुलबर्गा जिल्हय़ात 23, मंगळूर जिल्हय़ात 20 रुग्ण ब्लॅक फंगसमुळे दगावले आहेत. राज्यात आतापर्यंत 3,591 जणांमध्ये या फंगसची बाधा झाली आहे. त्यात बेंगळूरमधील 1,109, धारवाडमधील 279, विजापूरमधील 208 रुग्णांचा समावेश आहे.