30 जणांचे बळी, 1625 नवे बाधित
प्रतिनिधी / पणजी
गेल्या 24 तासात म्हणजे शुक्रवारी कोरोनामुळे 30 जण दगावले असून 3075 जण बरे झाले आहेत तर नव्याने 1625 रुग्ण सापडल्याची माहिती आरोग्य खात्याने दिली आहे. कोरोना बळींचा गेल्या वर्षीपासूनचा एकूण आकडा 2302 वर पोहोचला आहे.
शुक्रवारी 187 जणांना हॉस्पिटलमधून घरी पाठवण्यात आले आणि 207 जणांना दाखल करण्यात आले. दिवसभरातील 30 बळींपैकी 9 जण गोमेकॉत मृत्यू पावले तर 11 जणांचा दक्षिण गोवा जिल्हा इस्पितळात प्राण गेला. उत्तर गोव्यातील आणि दक्षिण गोव्यातील खासगी हॉस्पिटलात प्रत्येकी 4 जणांचे निधन झाले. ईएसआय हॉस्पिटल- मडगाव येथे व कुडतरी आरोग्य केंद्रात प्रत्येकी 1 रुग्ण दगावला अशी माहिती आरोग्य खात्याने प्रकाशित केली आहे.
गेल्या वर्षीपासून आतापर्यंत मिळून एकूण 143192 जणांना कोरोनाची लागण झाली आणि त्यातील 121562 जणांनी कोरोनावर मात केली आहे. सध्या 19328 एवढे सक्रिय कोरोना रुग्ण असून ते विविध हॉस्पिटलांत, घरांत, निगा पांत उपचार घेत आहेत. सुमारे 1438 जणांना होम आयसोलेशन देण्यात आले आहे.